बेळगाव लाईव्ह :रोटरी क्लब ऑफ बेळगावच्यावतीने स्वरूप -नर्तकी सिनेमा बेळगाव येथे 200 मुला -मुलींसाठी “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज” चित्रपटाचे विशेष प्रदर्शन करण्याचा स्तुत्य उपक्रम नुकताच पार पाडण्यात आला.
सदर उपक्रम सुप्रसिद्ध उद्योगपती शिरीष गोगटे यांनी शालेय मुलांना हा प्रेरणादायी चित्रपट पाहता येईल आणि आपल्या गौरवशाली इतिहासाची माहिती मिळेल या उद्देशाने प्रायोजित केला होता.
उपक्रमादरम्यान शिरीष गोगटे यांनी छ. शिवाजी महाराज आणि छ. संभाजी महाराज यांच्या वारशाविषयी उत्कटतेने सांगितले. समाजातील चांगली व्यक्ती बनण्यासाठी आपला इतिहास जाणून घेण्याचे आणि जतन करण्याचे महत्त्व त्यांनी विशद केले.
छ. शिवाजी महाराज आणि छ. संभाजी महाराज हे जगभरात पूजनीय असून ते आपल्या स्वतःच्या देशात विसरले जाऊ नयेत. अधोरेखित केले. मुलांना आपल्या समृद्ध वारशाबद्दल शिक्षित करण्यासाठी असे उपक्रम राबवणे गरजेचे आहे असे गोगटे यांनी नमूद केले.
याप्रसंगी माजी आरआरएफसी रो. अविनाश पोतदार, रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष रो. सुहास चांडक, रो. अजित सिद्दन्नावर, रो. अक्षय कुलकर्णी, अक्षय कथरिया यांच्यासह अन्य रोटरी सदस्य उपस्थित होते. उद्योगपती शिरीष गोगटे यांच्या भाषणाने उपस्थित शालेय मुला -मुलींना खूप प्रेरणा मिळाली आणि त्यांनी चित्रपटाचा मनमुराद आनंद लुटला.