बेळगाव लाईव्ह :दरवर्षी सुवर्ण विधानसौध येथे होणारे कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन म्हणजे बेळगावसाठी मंत्री, आमदारांच्या रूपाने “पाहुणे येती घरा आणि तोचि दिवाळी दसरा” असे झाले आहे.
येत्या 9 ते 20 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने कोणतीही समस्या निर्माण होऊ नये, अधिवेशन सुरळीत व्हावे या दृष्टीने प्रशासन कामाला लागले आहे. एरव्ही सर्वसामान्यांच्या समस्यांकडे ढुंकुनी न पाहणाऱ्या प्रशासनाला शहर परिसरात विविध समस्या असल्याचे दिसू लागले आहे. त्या अनुषंगाने रस्त्यांची दुरुस्ती, रंगरंगोटी आदी कामे हाती घेण्यात आली आहेत.
अधिवेशनाच्या निमित्ताने आमदार, मंत्री बेळगाव शहराचा येतात त्याचवेळी रस्त्यांची साफसफाई आणि डागडुजी केली जाते. अन्यथा वर्षातील 11 महिने बेळगाव शहरातील रस्त्यांची दुरावस्था बघवली जात नाही. शहरातील कांही रस्त्यांची इतकी दुर्दशा झाली आहे की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता? असा प्रश्न पडतो.
स्मार्ट सिटी योजनेची अंमलबजावणी करून कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले असले तरी शहरातील बहुतांश रस्ते व्यवस्थित झालेले नाहीत. आता राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्याने रस्त्याची साफसफाई आणि दुरुस्ती केली जात आहे. अधिवेशन स्थळ ते सर्किट हाऊस पर्यंतचा रस्ता तसेच मंत्री, आमदारांच्या निवासाची सोय केलेल्या हॉटेलपर्यंतच्या रस्त्यांची विशेष काळजी घेतली जात आहे.
डागडूजीसह झाडलोट करून हे रस्ते स्वच्छ ठेवण्याबरोबरच या रस्त्यांवरील दुभाजक आणि पुलांच्या कठड्यांची रंगरंगोटी केली जात आहे. त्याचप्रमाणे प्रमुख मार्गावरील सार्वजनिक आवार भिंतींवर देखील आकर्षक रंगरंगोटी केली जात आहे.
पथदीप बंद असले तरीही अनेक महिन्यांपासून दुर्लक्ष करत असणाऱ्या प्रशासनाकडून आता प्रमुख चौक आणि मार्गांवरील बंद पडलेले पथपदी व हायमास्टच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजवून ते स्वच्छ केले जात आहेत. मुख्यमंत्र्यांसह परगावच्या मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांच्या वाहनांना रस्त्यातील खड्ड्यांचे धक्के लागू नयेत. रात्री अंधाराचा सामना करावा लागू नये. कोणतीही समस्या निर्माण होऊ नये, या दृष्टीने प्रशासनाची धावपळ सुरू आहे.
अधिवेशन काळात वीज समस्या निर्माण होऊ नये यासाठी हेस्कॉमतर्फे विविध ठिकाणी दुरुस्तीचे काम हाती घेतले जात आहे. परिणामी वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने व्यापारी, कारखानदार, व्यावसायिकांना नुकसान सोसावे लागत आहे. एकंदर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहर सुंदर सुसज्ज करण्याचा खटाटोप प्रशासनाकडून केला जात असला तरी त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह व्यापारीवर्ग, कारखानदार व व्यावसायिकांना बसत आहे.
त्याचप्रमाणे फक्त आमदार मंत्र्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी धडपडणारे प्रशासन तशा सुविधा शहरातील सर्वसामान्य जनतेला कधी देणार? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.