बेळगाव लाईव्ह :बेळगाव ते बाची दरम्यानच्या अत्यंत खराब झालेल्या बेळगाव -वेंगुर्ला रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम युद्धपातळीवर हाती घेतले जावे अन्यथा येत्या 11 नोव्हेंबर रोजी या मार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आज सोमवारी सकाळी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने एका निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अभियंत्यांना दिला.
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपरोक्त निवेदन आज मंगळवारी सकाळी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांना सादर केले. सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहाय्यक कार्यकारी अभियंता शशिकांत कोळेकर व संजय गस्ती यांनी निवेदनाचा स्वीकार करून त्वरेने योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
त्यांच्याशी बोलताना माजी आमदार मनोहर किणेकर यांनी बेळगाव ते बाची दरम्यानच्या रस्त्याची झालेली दुर्दशा आणि त्यामुळे सर्वसामान्य वाहन चालकांना सहन करावा लागणार त्रास, वारंवार होणारे अपघात याबाबतची माहिती दिली.
त्याचप्रमाणे गेल्या कांही महिन्यापासून वारंवार अर्जविनंत्या करून देखील सदर रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल तीव्रखेद व्यक्त केला त्याचप्रमाणे जर आता तात्काळ या रस्त्याचे नूतनीकरणाचे काम हाती घेतले नाही तर येत्या सोमवार दि. 11 नोव्हेंबर रोजी उचगाव रस्त्यावरील मधुरा हॉटेल जवळ रास्तारोको करण्यात येईल, असा इशारा माजी आमदार किणेकर यांनी अधिकाऱ्यांना दिला.
यावेळी सहाय्यक कार्यकारी अभियंता शशिकांत कोळेकर यांनी या संदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे उपायोजना करण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र हे सरकारी काम असल्यामुळे त्याला थोडा विलंब होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. यावर कोणत्याही परिस्थितीत तात्काळ बेळगाव ते बाची या रस्त्याचे नूतनीकरण सुरू करावे, असा पवित्रा तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला. तसे न झाल्यास भव्य रास्ता रोको केला जाईल असेही पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
निवेदन सादर करतेवेळी तालुका समितीचे सरचिटणीस ॲड. एम. जी. पाटील, आर. एम. चौगुले, लक्ष्मण होनगेकर, रामचंद्र मोदगेकर, मोनप्पा पाटील, विठ्ठल पाटील,आर. के. पाटील, बी. एस. पाटील, बी डी मोहनगेकर, मोनाप्पा संताजी, मल्लाप्पा गुरव, अनिल पाटील, पियूष हावळ आदी उपस्थित होते.
उपरोक्त निवेदन सादर करण्याच्या पार्श्वभूमीवर आता उद्या मंगळवारी 5 नोव्हेंबर रोजी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची व्यापक बैठक दुपारी 2 वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हर ब्रिज) येथे आयोजित करण्यात आली आहे.
तरी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह आजी माजी लोकप्रतिनिधी , कार्यकारणीचे सदस्य, युवा आघाडी, महिला आघाडीचे कार्यकर्ते व समिती कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर व सरचिटणीस ॲड. एम. जी. पाटील यांनी केले आहे.