बेळगाव लाईव्ह :न्यायालयामध्ये बेकायदेशीररित्या बिनबोभाट वकिली व्यवसाय करणाऱ्या सोनिया धारा, प्रतिभा कदम आणि जुवैद निजामी या तोतया वकिलांवर, तसेच या वकिलांच्या तक्रारीवरून खऱ्या वकिलांवर गुन्हे दाखल करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी बेळगाव न्यायालयातील वकिलांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन छेडल्याची घटना आज सकाळी घडली.
संतप्त वकिलांनी बेळगाव न्यायालयासमोरील रस्त्यावर उपरोक्त आंदोलन छेडून निदर्शने करण्याद्वारे न्यायाची मागणी केली. यावेळी मार्केट पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधातही घोषणाबाजी करण्यात येत होती. आपल्या आंदोलन व मागण्या संदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना वकिलांनी सांगितले की, बेळगाव वकील संघटनेमध्ये सोनिया व्यंकटेश धारा (मुळ रा. गांधीवाढ, जि. धारवाड), प्रतिभा जे. कदम (रा. कित्तूर) आणि जुवैद अफजल निजामी (रा. वीरभद्रनगर, बेळगाव) अशा नावाचे तीन तोतये बनावट वकील आहेत.
वकिली व्यवसायासाठी आवश्यक कोणत्याही परीक्षा हे तिघे उत्तीर्ण झालेले नाहीत. वकिलीची सनद नसताना ते बिनबोभाटपणे न्यायालयात येऊन वकिली व्यवसाय करत आहेत. लोकांकडून पैसे घेऊन दुसऱ्याच्या नावावर वकालत घालून हे तिघे खटले लढवत असतात. तेंव्हा बेळगावच्या जनतेने या तीन तोतया पासून सावध राहावे. त्यांच्याकडे खटले आणि त्यासाठी पैसे कागदपत्रे देऊन स्वतःला मनस्ताप, नुकसान करून घेऊ नये. सदर तोतया वकिलांविरुद्ध मार्केट पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करून देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
पोलिसांनी तक्रारी संदर्भात अद्याप कोणतीच कारवाई केलेली नाही. दुसरीकडे सोनिया धारा, प्रतिभा कदम आणि निजामी या तोतया वकील त्यांच्याविरुद्ध तक्रार करणाऱ्या वकिलावर बलात्कार वगैरे सारखे गंभीर आरोप करून त्रास देत आहेत. पोलिसांनी देखील त्या तोतया वकिलांच्या तक्रारीवरून खऱ्या वकिलांवर गुन्हे दाखल केले आहेत. तेंव्हा आमची एकच मागणी आहे की संबंधित तिघेजण हे वकील नसल्यामुळे त्यांना वकिली व्यवसाय करण्यास दिला जाऊ नये. तसेच त्यांच्या सांगण्यावरून खऱ्या वकिलांवर गुन्हे दाखल करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याने कोणत्या आधारे हे गुन्हे दाखल केले त्याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे.
शहर पोलीस आयुक्तांनी त्या अधिकाऱ्यावर त्वरित क्रम घेतले पाहिजेत. असे सांगून लोकांना न्याय मिळवून देणाऱ्या वकिलांवरच आज स्वतःला न्याय मिळावा यासाठी झगडावे लागत असल्याचे खेदाने सांगितले. त्याचप्रमाणे संबंधित तोतया वकिलांना बेळगावमध्ये वकिली व्यवसाय करण्यास परवानगी दिली जाऊ नये. अन्यथा वकिलांबाबत समाजात चुकीचा संदेश जाईल. जनतेने देखील या वकिलांपासून सावध राहावे, असे आवाहन वकिलांनी केले.