बेळगाव लाईव्ह :परतीचा पाऊस थांबून उघडीप मिळाल्याने हलगा परिसरात भात कापणीला सुरुवात झाली आहे. मात्र आता पुन्हा मोड आल्याने शेतकरी चिंतेत पडले असून त्यांनी कापलेल्या भाताच्या वळ्या घालण्यास सुरुवात केली आहे.
यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे भात पिकांना अनुकूल वातावरण होते. शेतीवाडीमध्ये भात पिके जोमात आल्यामुळे बळीराजा सुखावला होता. तथापि दसरा ते दीपावली दरम्यान जोराचा पाऊस पडल्यामुळे भात पिकांची सराई मेरलेली आहे.
त्यानंतर आता गेल्या दोन-तीन दिवसांपासून परतीच्या पावसाने चांगली उघडीत दिल्यामुळे हलगा परिसरात भात कापणीला सुरुवात झाली आहे. एकीकडे भात कापणी सुरू असताना दुसरीकडे पुन्हा मोड आल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनले असून ते कापलेल्या भाताच्या वळ्या घालत आहेत.
दसरा -दिवाळी दरम्यान पडलेल्या पावसामुळे भात पिकाची सराई मेरलेली असल्यामुळे या भाताचे कणीक फार होऊन अख्खा तांदूळ कमी निघतो.
परिणामी व्यापारी या भाताला कमी दर देत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.