बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात स्मार्ट सिटी योजने अंतर्गत विविध भागात घरगुती गॅस पुरविण्यासाठी पाईपलाईन जोडण्यात आली आहे. या कामाचे कंत्राट मेगा गॅस या कंपनीला मिळाले असून या कंपनीकडून शहरात गॅस वाहिन्या घालण्यात आल्या आहेत.
या अंतर्गत बेळगाव शहर आणि उपविभागातील हजारो घरांना पीएनजी गॅस पुरविण्यात येत असून या गॅसचे मासिक बिल देण्याकरिता ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून सुविधा पुरविण्यात आली आहे.
मात्र ऑनलाईन बिल अदा करतेवेळी काहीजणांची बँक खाती हॅक करून बँक खात्यातील रक्कम गायब झाल्याची तक्रार पुढे येत आहे. याप्रकरणी सायबर पोलीस स्थानकात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत जोडणी करण्यात आलेल्या गॅस पाइपलाइनचा ठेका मेगा गॅस या कंपनीकडे आहे. मासिक बिलासाठी गॅसधारकांना फोन कॉल्स येत असून बिल अदा करण्यासाठी ऍप डाउनलोड करण्यासाठी सांगण्यात येत आहे. सदर ऍप डाउनलोड केल्यानंतर बँक खाते हॅक करून खात्यातील रक्कम लांबविली जात असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे.
गॅसधारकांचे बिल शिल्लक असल्याचे सांगून बिल अदा करण्यात आले नाही तर कनेक्शन तोडले जाण्याचा इशारा देण्यात येत आहे. यामुळे बिलाची रक्कम देण्यासाठी अनेकांनी फोनवर मिळालेल्या सूचनेनुसार ऍप डाउनलोड करताच बँक खात्यातून रक्कम गायब झाल्याची तक्रार केली आहे.
मेगा गॅस कंपनीच्या माध्यमातून 54 हजार घरांना पीएनजी गॅस पुरविण्याची योजना आहे. शहरातील उपनगरांमध्ये गॅस जोडण्या देण्यात आल्या आहेत. मात्र आता ज्यांनी या गॅस जोडण्या पूर्ण करून घेतल्या आहेत, त्यांच्यासमोर पुन्हा एक नवे सायबर संकट उभे ठाकले आहे. यासंदर्भात सायबर पोलीस विभागाने लक्ष घालून यामागचे सत्य बाहेर आणणे गरजेचे आहे.