बेळगाव लाईव्ह :रस्त्यांचे नवे नामकरण योग्य.. निर्णय बदलू नका -कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे मागणी:कॅन्टोन्मेंट भागातील रस्त्यांची ब्रिटिशकालीन नावे बदलून त्यांना छत्रपती शिवाजी महाराज व अन्य महान व्यक्तींसह वीर सैनिकांची नावे देण्याचा आपला निर्णय बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाने कदापी बदलू नये, अशा मागणीचे निवेदन आज कॅंप मधील रहिवासी व श्रीराम सेना हिंदूस्थानकडून कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाला देण्यात आले.
ब्रिटिश काळातील नावांनी असणाऱ्या कॅन्टोन्मेंट भागातील रस्त्यांची नावे बदलून त्यांना छत्रपती शिवाजी महाराज व अन्य महान व्यक्तींसह देशासाठी बलिदान दिलेल्या वीर सैनिकांची नावे देण्याचा निर्णय अलीकडेच बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डने घेतला आहे. सदर निर्णयाला कांही संघटनांनी आक्षेप घेतल्याचे वृत्त बेळगाव शहरात पसरले होते. सदर आक्षेपांचा विचार न करता कॅन्टोन्मेंट बोर्डने घेतलेला निर्णय योग्य असून तो निर्णय कायम ठेवावा, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
मागील काही महिन्यापूर्वी केंद्रीय संरक्षण खात्याने कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरातील रस्त्यांची नावे बदलून त्या रस्त्यांना स्वातंत्र्य सैनिक, वीर जवान यांच्यासह शूरवीरांची थोर पुरुषांची नावे देण्याचा निर्णय घेतला होता. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाने देखील सदर करण्याच्या अंमलबजावणी करण्याचा ठराव केला होता. त्यानुसार कॅम्प मधील हाय स्ट्रीट या मुख्य रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा ठराव संमत करण्यात आला होता.
मात्र गेल्या काही महिन्यात या निर्णयाविरुद्ध आक्षेप घेण्यात आल्याची माहिती मिळताच श्रीराम सेना हिंदुस्तान या संघटनेने याबाबतीत कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाला निवेदन सादर केले आहे.
यावेळी श्रीराम सेना हिंदूस्थानचे बेळगाव दक्षिण विभाग सेक्रेटरी सुमित मोरे, कॅम्प मधील श्रीराम सेना हिंदूस्थानचे प्रमुख रोहन दोषी, ख्रिस्तियानो परेरा, मेरी जोजी, येसय्या गोटेमकुल ( गोट्या ), अँथोनी जे., निरंजन गोजगेकर, सुभानी पानवाले, विशाल गोजगेकर, सुभाणी वाडीकर आदी कार्यकर्ते व रहिवासी उपस्थित होते.