बेळगाव लाईव्ह:पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या किरकोळ अपघातानंतर ट्रक-चालकाचा पाठलाग करून त्याचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना गेल्या शुक्रवारी दुपारी यमकनमर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काटाबळी जवळ घडली. खुनाच्या घटनेनंतर केवळ 8 तासात 5 आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे.
खून झालेल्या दुर्दैवी ट्रक चालकाचे नांव अजीम मलिकरिहान इप्पेरी (वय 23, रा संकेश्वर) असे आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे परसप्पा सत्यप्पा नाईक (वय 32), हालप्पा लक्ष्मण हल्यागोळ (वय 32), इराप्पा बसवण्णी नाईक (वय 34, तिघेही रा. बेनकोळी), हनुमंत विठ्ठल इडली (वय 30, रा. कटकोळ ता. रामदुर्ग) आणि अमित शिंदे (वय 36, रा. इचलकरंजी) अशी आहेत.
खुनी हल्ल्यात ट्रकमधील अल्ताफ बशीरअहमद मुल्ला (वय 36) आणि बाळकृष्ण तानाजी भोसले (वय 42, दोघेही रा. संकेश्वर) हे जखमी झाले असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याबाबतची थोडक्यात माहिती अशी की पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील बेनकोळी नजीक शुक्रवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास संकेश्वरहून बेळगावकडे जाणारा ट्रक (क्र. 09 सीडब्ल्यू 8700) मोटरसायकल व आयशरला (क्र. जेएल 7 एफ 7157) घासून गेला. अपघातानंतर न थांबता ट्रक चालकाने ट्रक तसाच पुढे दामटला.
त्यामुळे संतप्त झालेल्या आयशर व मोटरसायकल चालकांनी सुमारे दीड कि.मी. पाठलाग करून काटाबळीजवळ ट्रक दगड टाकून अडवला. दरम्यान त्यांनी आपल्या अन्य सहकाऱ्यांना बोलावून घेतले. या सर्वांनी ट्रक चालक व त्याच्यासोबत असलेल्यांना खाली उतरून शिवीगाळ करत काठीने व लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली.
मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या अजीम याला स्थानिक नागरिकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवले. मात्र उपचाराचा फायदा न होता त्याच दिवशी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला.
महामार्गावरील या खुनाच्या घटनेनंतर केवळ 8 तासात पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी अवघ्या 8 तासात 5 हल्लेखोरांना गजाआड केले आहे. याप्रकरणी यमकनमर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.