Wednesday, November 20, 2024

/

खून झालेल्या ‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावजवळ होन्निहाळ येथे सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून, तो श्रीनगर येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.

27 वर्षीय निंगनगौडा सन्नगौडर असे मृत युवकाचे नाव असून व्यवसायाने कारचालक असलेल्या या युवकाचा खून कोणी आणि कशासाठी केला, याचा उलगडा मात्र अद्याप झालेला नाही.

18 नोव्हेंबर रोजी सकाळी सांबरा विमानतळाजवळील होन्निहाळ येथे सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. निंगनगौडा शिवनगौडा सन्नगौडर (वय 27, मूळ रा. अलदकट्टी, ता. सौंदत्ती व सध्या रा. श्रीनगर) असे या युवकाचे नाव आहे. सिमेंटच्या विटांनी डोक्यावर वार करून त्याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

निंगनगौडाचे कुटुंबीय त्याच्या बेपत्ता असल्याची तक्रार माळमारुती पोलीस स्थानकात दाखल करणार होते. यावेळी पोलिसांनी होन्निहाळ येथे सापडलेल्या मृतदेहाचे छायाचित्र दाखवल्यानंतर कुटुंबीयांनी त्याची ओळख पटविली.

मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून नंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. निंगनगौडा व्यवसायाने कारचालक होता. 17 नोव्हेंबर रोजी त्याने मालकांना सौंदत्तीला देवदर्शनासाठी नेले होते. यरगट्टी येथे उतरून गावाला भेट दिल्यानंतर बेळगावला येण्यासाठी त्याने बस पकडली होती. मात्र तो बेळगावला पोहोचला नाही. दुसऱ्या दिवशी होन्निहाळ येथे त्याचा मृतदेह सापडला.

घटनेनंतर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग आणि उपायुक्त रोहन जगदीश यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मारिहाळचे पोलीस निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी पुढील तपास करत आहेत. युवकाच्या खुनामागील कारण अद्याप गुलदस्त्यात असून, पोलिसांचा तपास सुरू आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.