बेळगाव लाईव्ह:बेळगाव -वेंगुर्ला मार्गावरील हिंडलगापासून महाराष्ट्र सीमेलगतच्या बाचीपर्यंतच्या अत्यंत दुर्दशा झालेल्या रस्त्याची ताबडतोब नूतनीकरण करून चौपदरीकरण करावे.
तसेच बेळगाव तालुक्यातील खराब झालेले अन्य रस्तेही दुरुस्त करावेत, या मागणीसाठी आक्रमक झालेल्या बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आज सोमवारी सकाळी सदर मार्गावर ठिय्या आंदोलनाद्वारे सुमारे 2 तास भव्य रास्तारोको करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
बेळगाव -वेंगुर्ला मार्गावरील बेळगुंदी क्रॉसजवळ (हॉटेल मधुरा) बेळगाव तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सचिव एम. जी. पाटील, सहसचिव मनोहर संताजी, युवा नेते आर. एम. चौगुले, युवा आघाडीचे अध्यक्ष राजू किणयेकर, माजी जि. पं. सदस्य रामचंद्र मोदगेकर, सरस्वती पाटील आदींच्या नेतृत्वाखाली आज सकाळी रस्त्यावर ठिय्या मांडून छेडण्यात आलेल्या रास्तारोको आंदोलनात तालुक्याच्या सर्व भागातील समिती नेते व कार्यकर्त्यांसह नागरिक बहुसंख्येने सहभागी झाले होते. परिणामी रास्ता रोको लक्षवेधी ठरला होता. आंदोलनाप्रसंगी बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय या घोषणेसह शिवाजी रस्ता दुरुस्तीच्या आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या निषेधाच्या घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता.
याप्रसंगी बेळगाव लाईव्हशी बोलताना समिती अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले की, जनतेने सातत्याने मागणी करून देखील बेळगावपासून बाचीपर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा निवेदने देण्यात आली. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपणही करण्यात आले. मात्र तरीही सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्ता दुरुस्तीच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. खरंतर रायचूर ते बाची हा राज्य महामार्ग असताना 2002 साली रायचूर ते बेळगावपर्यंतच्या रस्त्याचा विकास केला गेला. त्यापुढे बेळगाव ते बाचीपर्यंतच्या रस्त्याच्या विकासाकडे गेली 22 वर्षे झाली लक्ष देण्यात आलेले नाही. तेंव्हा या रस्त्याचे देखील रायचूर ते बेळगाव पर्यंतच्या रस्त्याप्रमाणे नूतनीकरण केले जावे, अशी मागणी आम्ही जवळपास महिनाभरापूर्वी म्हणजे गेल्या 4 ऑक्टोबर रोजी एका निवेदनाद्वारे केली होती.
तथापि रस्ता दुरुस्ती व नूतनीकरणाची आमच्या मागणीची महिना झाला तरी पूर्तता करण्यात आली नसल्याने गेल्या 4 नोव्हेंबर रोजी आम्ही पुन्हा निवेदन सादर करून रास्ता रोकोचा इशारा दिला होता. त्यानुसार आज रास्तारोको केला जात आहे. फक्त बेळगाव ते बाची रस्ता नव्हे तर वाघवडे ते मच्छे, बडस ते बाकनुर तसेच बेळगाव तालुक्यातील इतर खराब झालेले रस्ते देखील दुरुस्त करावेत अशी मागणी घेऊन आम्ही आज हा रस्ता रोको करत आहोत. खरंतर हा राज्य महामार्ग असल्याने या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करणे ही सरकारची जबाबदारी असते.
दोन महिन्यापूर्वी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी केली होती. त्यावेळी या रस्त्याच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी 15 कोटी रुपये यांचा निधी मंजूर झाल्याचे वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले होते मात्र आता सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता 9 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे सांगत आहेत. तेंव्हा नेमके हे काय गौडबंगाल आहे? का आम्ही फक्त नूतनीकरणाऐवजी रस्त्याच्या दुरुस्तीवरच समाधान मानायचे? सध्या रस्त्याची करण्यात आलेली दुरुस्ती देखील वरवरची तात्पुरती आहे.
कारण वाहनांच्या वर्दळीमुळे दुरुस्ती केलेले रस्त्यावरील खड्डे पुन्हा दृश्यमान होऊ लागले आहेत. यासाठी आमची एकच मागणी आहे ज्याप्रमाणे रायचूर ते बेळगाव रस्ता करण्यात आला आहे त्याप्रमाणे बेळगाव ते बाचीपर्यंतचा रस्ता देखील करावा अशी आमची प्रमुख मागणी आहे असे सांगून जोपर्यंत या मागणीला मान्यता मिळत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून हलणार नाही, असा इशारा माजी आमदार मनोहर किणेकर यांनी दिला. यावेळी युवा नेते आर. एम. चौगुले, रामचंद्र मोदगेकर, एम. जी. पाटील आदींसह उपस्थित अन्य नेते मंडळींनी रस्त्याच्या नूतनीकरणाची गरज व्यक्त करून माजी आमदार किणेकर यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला.
समितीच्या आंदोलनाची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांनी तातडीने रास्ता रोकोच्या ठिकाणी दाखल होऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर यांनी खराब झालेल्या रस्त्याबद्दल माहिती देऊन त्याच्या नूतनीकरणाची मागणी केली. तसेच तशा आशयाचे निवेदन अभियंत्यांना सादर केले. त्यांनी निवेदनाचा स्वीकार करून बेळगावपासून बाचीपर्यंत जाणारा हिंडलगा ग्रामपंचायत हद्दीतील चौपदरी रस्ताचा बॉक्साइट रोड क्रॉसवरील समितीच्या हुतात्मा स्मारकापर्यंत विस्तार केला जाईल. त्याचप्रमाणे हिंडलगापासून पुढे बाचीपर्यंत जो रस्ता आहे त्याचे नूतनीकरण करून व्यवस्थित विकास साधला जाईल आणि रस्त्याचे हे काम येत्या 1 डिसेंबर 2024 पर्यंत हाती घेण्यात येईल. तत्पूर्वी बाचीपर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरणाची जी मागणी आहे ती आपण सरकार दरबारी मांडू, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांनी दिले. त्यांच्या या ठोस आश्वासनानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सुमारे 2 तास चाललेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे बेळगुंदी क्रॉस येथे बेळगाव -वेंगुर्ला मार्गावरील वाहतूक ठप्प होऊन चक्काजाम झाला होता. परिणामी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनाप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.