बेळगाव लाईव्ह :कर्नाटक विधिमंडळाच्या बेळगावमध्ये होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 9 डिसेंबर रोजी कोणत्याही परिस्थितीत मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित केला जाईल, अशी माहिती मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आज गुरुवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली असून तसे निवेदन सादर करण्यात आले आहे.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आयोजित केल्या जाणाऱ्या महामेळावा बाबत माहिती देण्यासाठी मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखाली आज गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी (डीसी) मोहम्मद रोशन यांची भेट घेतली.
सदर भेटीप्रसंगी माजी आमदार किणेकर व सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांनी कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 9 डिसेंबर रोजी मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्याचा उद्देश जिल्हाधिकाऱ्यांसमोर स्पष्ट केला. तसेच महामेळाव्याचे आयोजन आणि त्यासाठीच्या परवानगी संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
जिल्हाधिकारी रोशन यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. निवेदन सादर करतेवेळी किणेकर व अष्टेकर यांच्या समवेत माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील, प्रकाश मरगाळे, एम. जी. पाटील, रामचंद्र मोदगेकर, विकास कलघटगी आदी उपस्थित होते.
निवेदन सादर केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना माजी आमदार मनोहर किणेकर यांनी सांगितले की, बेळगावमध्ये येत्या 9 डिसेंबर 2024 रोजी कर्नाटक सरकारची हिवाळी अधिवेशन आहे. या अधिवेशनाच्या विरोधात आम्ही महाराष्ट्र एकीकरणतर्फे मराठी भाषिकांचा महामेळावा घेत असून त्याची कल्पना आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. कर्नाटक सरकारने जेंव्हा 2006 पासून बेळगावमध्ये विधिमंडळाचे अधिवेशन भरवण्यास सुरुवात केली, तेंव्हापासून त्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मराठी भाषकांच्या महामेळाव्याचे आयोजन केले जात आहे.
कर्नाटक सरकारला खरोखर जर बेळगावसह उत्तर कर्नाटकाची काळजी असती तर 1956 किंवा 1963 पासून त्या ठिकाणी अधिवेशन घ्यावयास हवे होते. मात्र महाराष्ट्र सरकारने 2004 मध्ये ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयामध्ये बेळगावसह सीमा प्रश्नाचा दावा दाखल केला. त्यानंतर 2006 पासून कर्नाटक सरकार बेळगावमध्ये अधिवेशन घेत आहे. याचा अर्थ फक्त बेळगाववर आणि येथील मराठी भाषिकांवर आपला हक्क सांगणे हा होतो. त्यासाठी सरकारच्या या वृत्तीच्या विरोधात आणि आम्ही कर्नाटकात राहू इच्छित नाही तसेच आम्हाला हे अधिवेशन मान्य नाही याची जाहीर स्पष्टता करण्यासाठी आम्ही महामेळाव्याचे आयोजन करत असतो. त्यानुसार येत्या 9 डिसेंबर 2024 रोजी आम्ही मराठी भाषिकांचा महामेळावा घेणार असून नियमानुसार त्याची पूर्वसूचना आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे.
जिल्हाधिकारी परवानगी देवोत अथवा न देवोत आम्ही महामेळावा घेणारच यात तीळ मात्र शंका नाही असे ठामपणे सांगून महामेळाव्याच्या आयोजनासाठी आम्ही शहरातील व्हॅक्सिन डेपो मैदान, छ. संभाजी महाराज उद्यान, छ. शिवाजी महाराज उद्यान, छ. संभाजी महाराज चौक, संयुक्त महाराष्ट्र चौक अथवा सरदार हायस्कूल मैदान या जागांची मागणी केली आहे, अशी माहिती माजी आमदार मनोहर किणेकर यांनी दिली.