बेळगाव लाईव्ह :बेळगावसह सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली आचरणात येत असलेल्या 1 नोव्हेंबर काळा दिनाच्या जाहीर सभेत सहभागी होण्यास येणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोल्हापूर येथील नेते विजय दवणे यांच्या बेळगाव हद्दीतील प्रवेशाला कर्नाटक पोलिसांनी मज्जाव केल्याची घटना आज सकाळी घडली.
भाषावार प्रांत रचने वेळी केंद्र सरकारने बेळगावसह मराठी सीमाभाग कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली बेळगावमध्ये आज 1 नोव्हेंबर काळा दिन पाळण्याबरोबरच निषेध सायकल फेरी आणि जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमांसाठी कोल्हापूर येथील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते विजय देवणे यांना निमंत्रण देण्यात आले होते. त्यानुसार सदर कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी कोल्हापूरहून निघालेल्या विजय देवणे आणि त्यांच्या समर्थकांना महाराष्ट्र -कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोल नाक्याच्या ठिकाणी अडविण्यात आले. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करून बेळगाव जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करण्यास मज्जाव करणाऱ्या कर्नाटकच्या पोलीस अधिकाऱ्यांना शिवसेना नेते देवणे यांनी समजावण्याचा प्रयत्न केला.
आपण बेळगावात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी नव्हे तर फक्त कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविण्यासाठी जात आहे असे सांगून महाराष्ट्रातील नेत्यांना काळा दिनाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास मज्जाव करावा, असा लेखी आदेश तुमच्याकडे आहे का? असा सवाल त्यांनी केला. त्यावर निरुत्तर झालेल्या कर्नाटकी पोलीस अधिकाऱ्यांनी “आम्हाला वरून आदेश आहे” एवढेच सांगत शिवसेना नेते विजय देवणे व त्यांच्या सहकाऱ्यांना कर्नाटक हद्दीतील प्रवेश नाकारला.
याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना शिवसेना नेते विजय देवणे म्हणाले की, बेळगावमध्ये मराठी भाषिकांकडून दरवर्षी 1 नोव्हेंबर काळा दिन पाडून सायकल फेरी काढण्याबरोबरच जाहीर मेळाव्याचे आयोजन केले जाते. आज होणाऱ्या या कार्यक्रमांसाठी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि काअअंही मराठी भाषिकांनी मला मराठा मंदिर येथे होणाऱ्या मेळाव्यास हजर राहण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने कोल्हापूर येथून मी बेळगावला निघालो होतो. मात्र कर्नाटक सरकारची महाराष्ट्राबद्दलची ‘पूतना’ मावशीच्या प्रेमाची प्रचिती आज या कोगनोळी नाक्याच्या ठिकाणी आम्हाला आली. मराठी माणसाला कोणत्याही बाबतीत परवानगी तेथील दंडाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख देत नाहीत.
आज तेथील मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्रातील एक प्रतिनिधी म्हणून मी जात असताना या ठिकाणी कर्नाटकातील पोलिसांनी मला अडवलं आहे. या पोलिसांनी मला जरी अडवले असेल तरी मराठी भाषिकांचा आवाज महाराष्ट्रातून दाबला जाणार नाही. खास करून की दडपशाही जेवढी कराल तेवढा लढा तीव्र होत जाईल असे माझे स्पष्ट मत आहे असे सांगून गेली अनेक वर्षे मराठी भाषिकांचा हा लढा सुरू आहे. तेंव्हा या दडपशाहीचा मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्रातील तमाम मराठी भाषिकांच्यावतीने निषेध नोंदवतो, असे विजय देवणे म्हणाले.