बेळगाव लाईव्ह :केंद्र सरकारने 1 नोव्हेंबर 1956 रोजी झालेल्या भाषावार प्रांतरचनेवेळी बेळगावसह संपूर्ण सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ समस्त सीमावासीय 1 नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून आचरणात आणून मुक सायकल फेरीद्वारे निषेध व्यक्त करतात. त्यानुसार ‘बेळगाव -कारवार -निपाणी -बिदर -भालकी सहसंयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, ‘बेळगाव आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे’ अशा परिसर दणाणून सोडणाऱ्या घोषणा देत आज शुक्रवारी 1 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली शहरात भव्य निषेध सायकल फेरी पार पडली.
काळा दिनाच्या निषेध फेरीसाठी आज सकाळपासूनच महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते महिला, आबालवृद्ध धर्मवीर संभाजी उद्यान येथे जमू लागले होते. म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली धर्मवीर संभाजी उद्यानातून सुरू झालेलया निषेध फेरीमध्ये भाषावार प्रांतरचनेवेळी केंद्र सरकारने केलेल्या अन्यायी कृतीच्या निषेधार्थ काळ्या रंगाचे कपडे, काळे व भगवे ध्वज, काळ्या टोप्या, डोक्याला काळी वस्त्रे बांधून प्रचंड संख्येने सहभागी झालेले समिती कार्यकर्ते व मराठी भाषिकांनी बेळगाव -कारवार -निपाणी -बिदर -भालकी सहसंयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, बेळगाव आमचा हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणतय देत नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी, रहेंगे तो महाराष्ट्र में नही तो जेल मे, केंद्र सरकारचा धिक्कार असो, बघता काय सामील व्हा, जय भवानी जय शिवाजी, यासारख्या घोषणा देऊन सायकल फेरीचा मार्ग दणाणून सोडला होता.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बॅनरसह भगवे व काळे ध्वज फडकवणारे कार्यकर्ते तसेच मराठी अस्मितेचे दर्शन घडवणारे बॅनर व फलक साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. निषेध फेरीचे नेतृत्व मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, माजी आमदार मनोहर किणेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, रमाकांत कोंडुसकर, रणजीत चव्हाण -पाटील, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर माजी नगरसेवक नेताजी जाधव आदींनी केले होते. दरवर्षीप्रमाणे यावेळी देखील केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी बालचमु देखील काळे झेंडे दाखवत निषेध फेरीत सहभागी होण्याद्वारे महाराष्ट्रात जाण्याची इच्छा व्यक्त करताना दिसत होता. यावेळी बोलताना समितीच्या नेते मंडळींनी काळा दिनाबाबत माहिती देऊन बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांची महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा प्रकट केली.
महाद्वार रोड येथील धर्मवीर संभाजी उद्यानातून सुरू झालेली निषेध फेरी तानाजी गल्ली रेल्वे गेट, भांदूर गल्ली, पाटील गल्ली, रामलिंग खिंड गल्ली, हेमुकलानी चौक, तहसीलदार गल्ली, फुलबाग गल्ली, शनी मंदिर, कपिलेश्वर उड्डाणपूल, एसपीएम रोड, शिवाजी उद्यान, नार्वेकर गल्ली, आचार्य गल्ली, गाडेमार्ग, सराफ गल्ली, काकेरू चौक, बसवान गल्ली, गणेशपुर गल्ली, जेड गल्ली, कोरे गल्ली, कचेरी गल्ली, मिरापूर गल्ली, खडेबाजार, बँक ऑफ इंडिया, महात्मा फुले रोड, गोवावेस सर्कल मार्गे खानापूर रोडवरील मराठा मंदिर येथे समाप्त झाली.
निषेध सायकल फेरी दरम्यान कोणती अनुचित घटना घडवू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते.