बेळगाव लाईव्ह :उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोतापेक्षा अधिक मालमत्ता जमा केल्याच्या आरोपाखाली कर्नाटक लोकायुक्तांच्या विशेष पथकाने काल मंगळवारी पहाटे राज्यातील बेळगावसह विविध जिल्ह्यांमधील 8 सरकारी अधिकाऱ्यांवर एकाच वेळी छापे टाकून मोठी कारवाई केली. या छापेमारीत भ्रष्ट अधिकाऱ्यांजवळ एकूण 22 कोटी 50 लाख 93 हजार 064 रुपयांची असमान अर्थात बेहिशेबी मालमत्ता आढळली असून ती जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
अवैध बेहिशेबी मालमत्ता आढळल्या प्रकरणी 8 सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध लोकायुक्त पोलीस ठाणे बेळगाव येथे 2 गुन्हे, तर हावेरी, दावणगिरी, बिदर, म्हैसूर, रामनगर आणि धारवाड या ठिकाणच्या लोकायुक्त पोलीस ठाण्यामध्ये प्रत्येकी 1 गुन्हा नोंद झाला आहे. लोकायुक्तांनी काल राज्यातील 11 सरकारी अधिकाऱ्यांची घर आणि कार्यालये, त्याचप्रमाणे त्यांच्या नातलगांच्या घरे अशा एकूण 37 ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली. या छापेमारीमध्ये 8 अधिकारी दोषी आढळून आले असून त्यांच्याजवळ आढळलेल्या बेकायदा मालमत्तेचा तपशील गोळा करण्यात आला आहे. सदर तपशील (अनुक्रमे भ्रष्ट अधिकाऱ्याचे नाव, जिल्हा : जागा -घरे -जमीन, रोकड, दागिने, वाहने, इतर, एकूण बेकायदा मालमत्ता रुपयांमध्ये यानुसार) पुढील प्रमाणे आहे. 1) विठ्ठल शिवाप्पा ढवळेश्वर, बेळगाव : 10050000, 155195, 302049, 345000, 0, 10852244. 2) व्यंकटेश एस. मुजुमदार, बेळगाव : 16300000, 142000, 3931900, 1770000, 0, 2214390. 3) काशिनाथ बुड्डाप्पा भजंत्री, हावेरी : 26110000, 2000000, 1000000, 1130000, 1832000, 32072000. 4) कमलराज पी. एच., दावणगिरी : 13211000, 115000, 1579000, 3230000, 1800000, 19935000. 5) रवींद्र कुमार, बिदर : 35016911, 32000, 2728732, 3310000, 1204561, 42292204. 6) नागेश डी. म्हैसूर : 19500000, 98000, 2925360, 1361901, 3389455, 27274716. 7) प्रकाश व्ही., रामनगर : 39783000, 17700, 1500000, 1300000, 0, 42600700. 8) गोविंदाप्पा हनुमंतप्पा भजंत्री, धारवाड : 18500000, 4111000, 2711300, 2000000, 600000, 27922300.
एकंदर वरील प्रमाणे जागा, घरे व जमिनीच्या स्वरूपात एकूण 17 कोटी 84 लाख 70 हजार 911 रुपये किमतीची बेकायदा मालमत्ता, 66 लाख 70 हजार 895 रुपयांची बेनामी रोख रक्कम, 1 कोटी 66 लाख 78 हजार 341 रुपये किमतीचे दागदागिने, 1 कोटी 44 लाख 46 हजार 901 रुपये किमतीची वाहने, 88 लाख 26 हजार 16 रुपयांच्या अन्य बेकायदेशीर बाबी अशी एकूण 22 कोटी 50 लाख 93 हजार 064 रुपयांची असमान अर्थात बेकायदा मालमत्ता संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांकडे आढळली असून ती जप्त करण्यात आली आहे.
भ्रष्ट अधिकाऱ्यांपैकी बेळगाव जिल्ह्याच्या निपाणी तालुक्यातील बोरगावचे तलाठी विठ्ठल शिवाप्पा ढवळेश्वर यांच्या घरासह अन्य तीन ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. या धाडींमध्ये 1 घर, 4 एकर कृषी जमीन अशी एकूण 1 कोटी 50 हजार रुपये किमतीची स्थावर मालमत्ता, त्याचप्रमाणे 1 लाख 55 हजार 195 रुपये रोख रक्कम, 3 लाख 2 हजार19 रुपये किमतीचे दागिने, 3 लाख 45 हजार रुपये किमतीचे वाहने अशी एकूण 8 लाख 224 रुपयांची जंगम मालमत्ता. या पद्धतीने ढवळेश्वर यांच्याकडे एकूण एक कोटी आठ लाख 52 हजार 244 रुपये मूल्याची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे.
बेंगलोर येथील व्यावसायिक कर विभागाचे सहाय्यक आयुक्त व्यंकटेश मुजुमदार यांच्या सह्याद्रीनगर, बेळगाव येथील घरासह 5 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. त्यामध्ये 2 घरे, एक गॅस गोडाऊन, 1 एकर कृषी जमीन अशी एकूण 1 कोटी 63 लाख रुपये किमतीची स्थावर मालमत्ता, त्याचप्रमाणे 1 लाख 42 हजार रुपयांची रोकड, 39 लाख 31 हजार 900 रुपये किमतीचे दागिने, 17 लाख 70 हजार रुपये किमतीची वाहने अशी एकूण 58 लाख 43 हजार 900 रुपये किमतीची जंगम मालमत्ता. या पद्धतीने मुजुमदार यांच्याकडे एकूण 2 कोटी 21 लाख 43 हजार 900 रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे.
इतर भ्रष्ट अधिकाऱ्यांपैकी हावेरी जिल्ह्यातील ग्रामीण पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि स्वच्छता उपविभाग हिरेकेरूरचे सहाय्यक अभियंता काशिनाथ बुड्डाप्पा भजंत्री यांच्याकडे एकूण 3 कोटी 20 लाख 72 हजार रुपये किमतीची बेहशेबी मालमत्ता सापडली आहे. त्याचप्रमाणे दावणगिरी जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र कारुरू येथील जिल्हा औद्योगिक केंद्र वाणिज्य आणि औद्योगिक खात्याचे सहाय्यक संचालक कमलराज यांच्याकडे 1 कोटी 99 लाख 35 हजार रुपये, बिदर जिल्ह्यातील प्रशिक्षण केंद्र उपसंचालक (उपतहसीलदार) रवींद्र कुमार यांच्याकडे 4 कोटी 22 लाख 92 हजार 204 रुपये, म्हैसूर जिल्ह्यातील म्हैसूर शहर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी नागेश डी. यांच्याकडे 2 कोटी 72 लाख 74 हजार 716 रुपये त्याचप्रमाणे रामनगर जिल्ह्यातील केएसआरटीसीचे निवृत्त विभागीय तांत्रिक अभियंता प्रकाश व्ही. यांच्याकडे चार कोटी 26 लाख 700 रुपये आणि धारवाड जिल्ह्यातील केआयएडीबी लक्कमनहळ्ळीचे सहाय्यक सचिव गोविंदाप्पा हनुमंतप्पा भजंत्री यांच्याकडे 2 कोटी 79 लाख 22 हजार 300 रुपयांची असमान बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे.