बेळगाव लाईव्ह : खादरवाडी येथील बकाप्पा वारी जमिनीची विक्री केल्याचा आरोप झाल्यानंतर या प्रकरणी संघर्ष अधिक तीव्र झाला. यादरम्यान मध्यस्थींनी देखील शेतकऱ्यांवर काही आरोप केले. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी पुन्हा एक बैठक घेऊन पुराव्यानिशी जमिनी विक्रीप्रकरणी सामील असलेल्या मध्यस्थींविरोधात आक्रोश व्यक्त केला आहे.
खादरवाडी येथील ब्रम्हलिंग मंदिरात नुकतीच येथील शेतकरी संघटनेची बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या आरोपांवर उत्तर देण्यात आले. शेतकरी संघटनेचे प्रमुख राकेश पाटील यांनी पुराव्यानिशी सर्व उत्तरे मंडळी असून वारीची जमीन विकणाऱ्या कमिटीचे सदस्य बाळाराम पिंगट यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.
सदर जमिनीचा व्यवहार ३ फेब्रुवारी २०२३ रोजीच पूर्ण करण्यात आला असून यासंदर्भातील माहिती १५ फेब्रुवारी २०२३ रोजी देऊन गावकऱ्यांची फसवणूक करण्यात आली. यासंदर्भातील प्रस्ताव स्वतः बाळाराम पिंगट यांनी लिहिला असून जमिनीचा व्यवहार देखील परस्पर ठरवून जमिनीची विक्री करण्यात आली. जमीन विक्री प्रकरणी गावात आक्रमक पवित्रा घेत मोर्चे, बैठक झाल्या. काहींना तुरुंगवास भोगावा लागला. मात्र यादरम्यान एकही शब्द न उच्चारणाऱ्या मध्यस्थींनी अचानकरीत्या गावकरी आणि शेतकरी कमिटीवर बिनबुडाचे आरोप केले आहेत.
गावातील शेतकरी संघटनेने बकाप्पा वारीची जमीन वाचविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळे खादरवाडी गावातील १८० एकर पैकी १२० एकर जमिनीवर गावाचे सामायिक नाव आले आहे. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून मध्यस्थींनी चुकीची माहिती पसरविण्याचा प्रयत्न केला असून यावर आता समस्त बेळगावकरांनी तोडगा काढावा, अशी मागणी ग्रामस्थ शेतकरी कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे.