बेळगाव लाईव्ह : खादरवाडी येथील ‘बकाप्पा माळ’ जमीन प्रकरणी सुरु असलेल्या वादाला नवी कलाटणी मिळाली असून यामध्ये बुडा आयुक्तांच्या नावाचा उल्लेख करण्यात आल्याने जमीन व्यवहारावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभारले आहे.
जमीन व्यवहार प्रकरणी सहभागी असलेल्या मध्यस्थी एजंटांच्या उपस्थितीत काल झालेल्या बैठकीत धक्कादायक बाब समोर आली असून बुडा आयुक्तांनी ठरवलेल्या रकमेनुसार जमिनीचा व्यवहार झाल्याचा आरोप पुढे आला आहे.
शिवाय दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार अभय पाटील यांच्या नातलगांच्या नावेही जमिनीची नोंद झाल्याची माहिती उजेडात आली आहे. या आरोपानंतर पुन्हा ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत असून हा विषय चर्चेचा ठरला आहे.
खादरवाडी गावातील शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी आवाज उठवताना गावात निषेध मोर्चा काढला. यानंतर एजंटांसमवेत ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत यावर तोडगा काढण्यासाठी तसेच संमत करण्यात आलेल्या नुकसान भरपाईच्या रकमेसंदर्भात बोलाविण्यात आलेल्या बैठकीत एजंटांनी बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे यांचे नाव पुढे केले असून त्यांच्या संगनमतानेच जमीन व्यवहाराची रक्कम ठरविण्यात आल्याचा आरोप केला आहे.
तसेच या जमिनी दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार अभय पाटील यांच्या नातलगांच्या नावे नोंद असल्याचे समोर आल्याने गावातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बुडा कमिशनर प्रीतम नसलापुरे यांनी एक कोटी आठ लाख रुपये प्रती एकर रक्कम ठरवली होती, परंतु शेतकऱ्यांना केवळ एक लाख रुपये प्रति एकर भरपाई देण्यात आल्याची तक्रार पुढे आली आहे. आता, या प्रकरणात एक नवा वळण आल्याने शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना बुडा कमिशनर तसेच संबंधित एजंटांना करावा लागेल.
खादरवाडीच्या बक्कापा माळाच्या जागेच्या मालकीविषयी देखील काही प्रश्न उपस्थित झाले असून दक्षिण विधानसभा क्षेत्राचे आमदार अभय पाटील यांच्या नातलगांच्या नावे या जागेचे हस्तांतरण कसे झाले यावर सध्या गावात चर्चा सुरू आहे. गावातील शेतकऱ्यांनी या प्रकरणाचा तपास आणि योग्य कारवाईची मागणी केली आहे.