बेळगाव लाईव्ह :चवताळलेल्या मधमाशांनी जनावरांना चारा आणण्यास शेतामध्ये गेलेल्या शेतकऱ्यांवर केलेल्या अचानक हल्ल्यामध्ये 2 शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास बेळगाव तालुक्यातील हलगा येथे घडली.
मधमाशांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोन्ही शेतकऱ्यांना उपचारासाठी तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, हलगा गावातील शेतकरी नेहमीप्रमाणे आज सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास हलगा शिवारातील आपल्या शेतामध्ये जनावरांचा चारा आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी आकाशात विहार करणाऱ्या एका घारीने आपले भक्ष असणाऱ्या शेतातील झाडावरील मधमाशांच्या पोळ्यावर झडप घातली.
त्यामुळे चौताळून उठलेल्या मधमाशांनी शेतामध्ये चारा गोळा करणाऱ्या शेतकऱ्यांसह भात मळणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर हल्ला चढवला. मधमाशांनी अचानक हल्ला चढवल्यामुळे भयभीत झालेले शेतकरी सैरावैरा पळू लागले. मधमाशांच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक शेतकरी सुरक्षित जागा शोधू लागला. त्यांच्यापैकी काहींनी मळणीसाठी असलेल्या तट्टांखाली दडी मारली. दोघा शेतकऱ्यांना मात्र लपण्यासाठी वेळीच सुरक्षित जागा मिळू शकली नाही.
परिणामी शेकडो मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला चढवून आपला विषारी दंश केला. मधमाशांच्या या हल्ल्यात दोघा शेतकऱ्यांपैकी वयस्कर असलेला शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. सदर आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या घटनेनंतर दोन्ही जखमी शेतकऱ्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, विशेष करून सुगीच्या दिवसांमध्ये आकाशात विहार करणाऱ्या घारी शेतामध्ये झाडांवर असलेल्या मधमाशांच्या पोळ्यांवर हल्ला करत असतात. मागे देखील घारीने डिवचल्यामुळे चवताळलेल्या मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हलगा येथील एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
तेंव्हा शेतातील बांधावर असलेली झाडे किंवा आसपासच्या मोठ्या झुडपांमध्ये मधमाशांची पोळी असू शकतात हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी. सध्या सुगीच्या दिवसात घारीमुळे घडलेल्या उपरोक्त घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेंव्हा शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घेऊन शेतीची कामे केली पाहिजेत, असे मत जाणकारांमध्ये व्यक्त होत आहे.