बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून, बुधवारमी दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे.
महाराष्ट्र राज्य हे कर्नाटक राज्याच्या शेजारील राज्य असल्याने, महाराष्ट्रातील मतदारांचे कर्नाटक राज्यात कामकाज करत असल्याची शक्यता आहे.
त्यामुळे सीमाभागातील बीदर, विजयपूर, बेळगाव आणि कलबुर्गी या जिल्ह्यांतील सर्व राज्य सरकारी कार्यालये, शाळा-काॅलेजेस (अनुदानित शिक्षण संस्थांसह), राष्ट्रीयीकृत बँका, जीवन विमा महामंडळ, आर्थिक संस्था आणि व्यवसाय, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर कोणत्याही संस्थांमध्ये कायमस्वरूपी किंवा रोजंदारीवर काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील पात्र मतदारांना
मतदान सोयीसाठी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट 1881 च्या कलम 25 आणि लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 135बी अंतर्गत सर्व उपबंधांनुसार एक दिवसाच्या वेतनासह रजा मंजूर करावी, असे आदेश कर्नाटकाच्या राज्यपालांनी दिले आहेत.
ही रजा फक्त पात्र मतदारांसाठी असून, संबंधित अधिकृत व्यक्तींनी ती मंजूर करणे बंधनकारक राहील. या सुविधेचा अधिकाधिक वापर करण्यासाठी व्यापक प्रचार करावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

