बेळगाव लाईव्ह :गुलमोहर बाग या बेळगावातील कलाकारांच्या समूहातर्फे टिळकवाडी येथील हेरवाडकर शाळेजवळील वरेरकर नाट्य संघाच्या कला महर्षी के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरीमध्ये येत्या रविवार दि. 10 ते गुरुवार दि. 14 नोव्हेंबर 2024 या कालावधीत “ट्रँक्विल ब्लूज” नावाच्या कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर पाच दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये विविध कलाकार कला प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता माजी खासदार मंगला अंगडी, बेळगावी, बेळगावचे प्रख्यात कलाकार फिरदोश मोदी आणि प्रसिद्ध वास्तुविशारद सुश्री माधुरी गुलाबानी यांच्या हस्ते होणार आहे.
औपचारिक उद्घाटनादरम्यान सकाळ वृत्तपत्रातील प्रख्यात पत्रकार आणि स्तंभलेखकांचा त्यांच्या “चित्रांचे जग” या स्तंभामध्ये बेळगावच्या कलाकारांच्या अतुलनीय योगदानचा परिचय करून दिल्याबद्दल सत्कार करण्यात येईल. “ट्रँक्विल ब्लूज” कला प्रदर्शन दररोज सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे. या प्रदर्शनात 11 ते 13 नोव्हेंबर या कालावधीत दररोज सायंकाळी 4 वाजता अनुक्रमे मधुसूदन महाले, महेश होनुले आणि शिल्पा खडकभावी या कलाकारांकडून चित्रकलेची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत.
गुलमोहर बाग हा बेळगावच्या कलाकारांचा समूह आहे. 2018 मध्ये त्याची स्थापना झाल्यापासून दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. कलेची आवड असलेल्या अनेक सदस्यांचे या समूहाने स्वागत केले आहे.
गुलमोहर बागच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या विविध कलाप्रकारांच्या सर्जनशील अभिव्यक्तीसाठी व्यासपीठ सापडले आहे. “ट्रँक्विल ब्लूज” कला प्रदर्शनात गुलमोहर बागच्या 29 कलाकारांनी निळ्या थीमवर केंद्रित त्यांच्या कलाकृती सादर केल्या आहेत.