बेळगाव लाईव्ह :राज्याच्या कर्मचारी सुधारणा आणि प्रशासन विभागाने एका आदेशाद्वारे राज्यातील सर्व सरकारी कार्यालयामध्ये यापुढे धुम्रपानासह पान मसाला, तंबाखू आदींच्या सेवनावर बंदी घातली आहे.
सरकारी कार्यालयांमध्ये धूम्रपान करण्याबरोबरच पान मसाला आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून कार्यालयाच्या भिंतीवर तसेच इतरत्र कोठेही थुंकले जात होते. अलीकडेच सोशल मीडियावर कार्यालयात बसून कर्मचारी धूम्रपान करत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते.
याची कर्मचारी सुधारणा आणि प्रशासन विभागाने गंभीर दखल घेऊन सर्व सरकारी कार्यालयांना वरील प्रमाणे आदेश बजावला आहे. सदर आदेशानुसार सरकारी कार्यालयांमध्ये आणि कामाच्या वेळेत असताना सार्वजनिक ठिकाणी थांबून यापुढे कर्मचार्यांना बीडी अथवा सिगारेट ओढता येणार नाही.
कार्यालयीन वेळेत त्यांना तंबाखू आणि पान मसाला खाण्यावर बंदी असेल. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा आदेशाद्वारे देण्यात आला आहे.