बेळगाव लाईव्ह :राजहंसगड येथील 32 गुंठे गावठाण जमीन हडप करण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या आरोपावरून त्या जमिनीचे सर्वेक्षण करण्यास आलेल्या अधिकाऱ्यांना कांही जणांनी विरोध करून त्यांना माघारी हुसकावून लावल्याची घटना आज घडली.
त्यामुळे गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत असून जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी जातीने लक्ष घालून संबंधित गावठाण जमीन मोजमाप करून गावकऱ्यांसाठी खुली करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
राजहंसगड येथील सर्व्हे नं. 50 हिस्सा नं. 3 मधील 32 गुंठे जमीन गावठाण म्हणून सरकार दप्तरी आणि सुळगे (ये.) ग्रामपंचायत रेकॉर्डमध्ये नोंद आहे. तथापि कांही जणांनी जमीन वडिलोपार्जित आहे असे भासवून सदर गावठाण जमीन हडप करण्याचा प्रयत्न चालू केला आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी तक्रार करून गावठाण मोजणीसाठी अर्ज केला होता.
त्या अर्जाची दखल घेत सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी त्या जमिनीचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने सर्वेक्षण कार्यालयामधून जमिनीच्या सभोवताली असलेल्या 22 व्यक्तींना नोटीस बजावून दि. 28 नोव्हेंबर 2024 रोजी मोजणीच्या ठिकाणी हजर राहण्यास सांगण्यात आले होते.
त्यानुसार आज संबंधित सर्वजण तसेच सर्वेक्षण कार्यालयातील मोजणी अधिकारी, ग्रामपंचायत पीडीओ व तलाठी असे सर्वजण हजर झाले होते. मात्र यावेळी त्या जमिनीमध्ये अतिक्रमण केलेल्यांनी मोजणी करण्यास विरोध केला.
सुळगा (ये) ग्रा. पं. पीडीओंनी देखील अधिवेशनाचे कारण सांगून जमीन मोजणी थांबविली. तसेच पुढच्या वेळी पोलीस संरक्षणात मोजणी केली जाईल असे सांगितले. तेंव्हा ग्रामस्थांनी जाब विचारताच मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी उडवा उडवीची उत्तरे देऊन तिथून काढता पाय घेतला.
सदर प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत असून आज गावठाण जमिनीची मोजणी न होण्यामागे पीडीओंचाच हात असल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः जातीने लक्ष घालून सदर गावठाण जमिनीची मोजणी करून गावाच्या उपयोगासाठी लवकरात लवकर खुली करून द्यावी. त्याचप्रमाणे सर्वेक्षणासाठी आलेले अधिकारी सर्वेक्षण न करता का आणि कोणाच्या दबावामुळे करत गेले? सुळगे (ये.) ग्रा.पं. पीडीओ भुजबळी जकाती यांनी देखील सर्वेक्षण थांबवण्याचा प्रयत्न का केला? पुढच्या वेळी पोलीस संरक्षणात मोजणी करतो असे ते का म्हणाले? याची देखील चौकशी करावी अशी मागणी राजहंसगड ग्रामस्थांकडून केली जात आहे. तसेच तशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्याची तयारी त्यांनी केली आहे.