बेळगाव लाईव्ह :बेळगाव येथे येत्या डिसेंबरमध्ये (9-20) होणारे हिवाळी अधिवेशन संपूर्ण अधिवेशन म्हणून आयोजित केले तरच अर्थपूर्ण होईल, असे मत केएलई सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी व्यक्त केले आहे.
बेळगाव येथे हिवाळी अधिवेशन घेण्यामागचा मूळ उद्देश या प्रदेशातील समस्या सोडवण्याकडे लक्ष वेधणे हा होता, मात्र येथे अधिवेशन भरवण्यास प्रारंभ होऊन एक दशकाहून अधिक काळ उलटून गेला तरी येथील विविध गंभीर समस्या ‘जैसे थे’ आहेत. तेंव्हा या प्रदेशातील आव्हानांवर सर्वसमावेशक चर्चा करण्यासाठी समर्पित एक महिनाभर सत्र आयोजित करण्याचे आवाहन डॉ. कोरे यांनी सरकारला केले.
“आपण निव्वळ निषेधाच्या पलीकडे जाऊन विकासाला प्राधान्य द्यायला हवे,” असे डॉ. कोरे म्हणाले. केएलई सोसायटीच्या जेएनएमसी सभागृहात 2006 मध्ये पहिले अधिवेशन झाले आणि त्यानंतर गेल्या 17 वर्षांत 11 अधिवेशने झाली.
यादरम्यान 2012 मध्ये 400 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या बेळगाव येथील सुवर्ण विधान सौधाची उत्तर कर्नाटकच्या विकासाचे प्रतीक म्हणून कल्पना करण्यात आली होती. तथापि दरवर्षी केवळ दहा दिवस अधिवेशन भरून या भागातील सर्वसामान्यांच्या आशा आकांक्षावर पाणी टाकण्याचे काम होत आहे. उत्तर कर्नाटकातील ज्वलंत समस्या सोडवण्यासाठी अधिवेशन उपयुक्त ठरणे गरजेचे होते. मात्र 10 वर्षे उलटून गेले तरी कोणतेही अधिवेशन त्यादृष्टीने यशस्वी झालेले नाही, असे डॉ. प्रभाकर कोरे यांनी खेदाने सांगितले.
अधिवेशनादरम्यान आमदारांना राहण्यासाठी आमदार भवन बांधण्याची दीर्घकाळची मागणी पूर्ण होत नाही. अधिवेशनातील आमदारांच्या व्यस्ततेचा अभाव आणि अधिवेशनाचा अल्प कालावधी हे महत्त्वपूर्ण अडथळे म्हणून पाहिले जातात. आमदार आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासी सुविधांच्या उभारणीसह पूर्ण कालावधीचे अधिवेशन हा या भागातील जनतेचा ध्वनी असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
विस्तारित अधिवेशने आयोजित केल्याने आमदारांना शेतकरी, मजूर आणि इतर उपेक्षित घटकांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्या सोडवता येतील. “आपण आत्ताच कृती केली नाही तर ही अधिवेशने म्हणजे एक फालतू आणि औपचारिक खटाटोपाशिवाय दुसरे कांही ठरणार नाही,” असा इशारा डॉ कोरे यांनी दिला.
सुवर्ण विधान सौध स्थापनेमागील प्रयत्नांचा सरकारने सन्मान करावा आणि उत्तर कर्नाटकतील समस्यांचा अंधार दूर करणाऱ्या दिपात त्याचे रूपांतर करावे, असे आवाहन डॉ. कोरे यांनी केले.