बेळगाव लाईव्ह :रघुनाथ पेठ, अनगोळ येथील श्री शिवनेरी युवक मंडळाने यंदा सलग 27 व्या वर्षी किल्ल्याची भव्य प्रतिकृती बनवण्याचा आपला उपक्रम अखंड सुरू ठेवला असून यंदा त्यांनी तामिळनाडू येथील किल्ले श्री शिवगंगा (तंजावर) या वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक किल्ल्याची भव्य प्रतिकृती साकारली आहे. किल्ल्याची ही प्रतिकृती कौतुकाचा विषय झाली असून ती पाहण्यासाठी वाढती गर्दी होत आहे.
श्री शिवनेरी युवक मंडळाने इतिहासकालीन अभेद्य समजल्या जाणाऱ्या श्री शिवगंगा अर्थात तंजावरच्या किल्ल्याची प्रतिकृती अगदी हुबेहूब साकारली आहे. बारीकसारीक तपशिलांचा अभ्यास करून किल्ल्यातील राजवाडा, मंदिरं, धन्वंतरी महाल, सरस्वती महाल बाबींसह तटबंदी, बुरुज वगैरे गोष्टींची निर्मिती अतिशय सुबकरीत्या करण्यात आली आहे.
तंजावरच्या किल्ल्याची ही भव्य प्रतिकृती विद्युत रोषणाई बरोबरच तिच्या बुरुजांवर प्रज्वलित केलेल्या पणत्यांमुळे रात्रीच्या वेळी तर अतिशय मनोहारी दिसते. त्यामुळे हा किल्ला अनगोळ परिसरात कौतुकाचा विषय झाला असून विशेष करून सायंकाळनंतर किल्ला पाहण्यासाठी मुलाबाळांसह नागरिकांची वाढती गर्दी होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज स्थापन केले, त्याच प्रमाणे दूर कर्नाटकात आणखी एक मराठी राज्य उदयास आले ते म्हणजे तंजाऊर हे होय. तंजावरचा फार पूर्वीचा इतिहास आढळत नाही, पण चोळ राजवटीपासून तंजावर जगाच्या नकाशावर आले. चोळ घराण्यातील राजांनी येथे 400 वर्षे राज्य केले. इ. स. 1676मध्ये विजापूरच्या सुलतानाने व्यंकोजीराजे भोसले यांना तंजावर ताब्यात घेण्यासाठी पाठविले आणि मराठ्यांचा तमिळनाडूशी संबंध आला.
व्यंकोजीराजे हे शिवाजीराजांचे सावत्रभाऊ म्हणजेच शहाजीराजे भोसले व त्यांची पत्नी तुकाबाई यांचे पुत्र होते. शाहूजी (प्रथम), सरफोजी (प्रथम), तुकोजी, प्रतापसिंह, सरफोजी (द्वितीय), शिवाजी (द्वितीय) यांच्यानंतर तंजावरचे संस्थान ब्रिटिशांनी खालसा केले. बाबाजीराजे भोसले हे सध्या तंजावरचे वारस राजे आहेत. तंजावर हे सध्या एक सांस्कृतिक केंद्र व प्रेक्षणीय स्थळ म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. येथे पूर्वी 74 मंदिरे होती. त्यातील 35 मंदिरे अजूनही उभी आहेत. तंजावरच्या मराठी संस्थानिकांनी स्थानिक भाषा आत्मसात करून त्यांचे राज्य राखलेच; पण तेथील प्रजेशी सलोखा राखला व संस्कृती जपली. तंजावर हेदेखील याचेच उत्तम उदाहरण आहे.
तंजावरचे महाराज छत्रपती सरफोजीराजे भोसले (1777-1832) फक्त लढाया आणि गनिमी काव्यातच तरबेज नव्हते तर ते एक निष्णात वैद्यक होते. महाराज फक्त औषधपचारच करत नव्हते तर चक्क मोतीबिंदूचे शस्त्रक्रिया देखील करत असत. सरफोजी महाराजांनी धन्वंतरी महाल बांधला. तेथे आयुर्वेद, युनानी यावर संशोधन चाले. महाराजांनी ‘सर्बेन्द्र वैद्य मुरेगल’ नावाचा वैदक शास्त्रावरील ग्रंथ लिहिला.
सरफोजी महाराज स्त्री मुक्तीचे पुरस्कर्ते होते. त्यांनी स्त्री शिक्षकांची नेमणूक केली होती. सहिष्णू वृत्तीच्या या राजाने कित्येक ख्रिस्चन मिशनऱ्यांच्या शाळांना आणि तंजावरच्या बडे हुसेन दर्ग्याला मदत केली. संस्कृत ,फ्रेंच, इंग्लिश, लॅटिन, इटालियन, डेनिस, ग्रीक, तमिळ, तेलगु, कन्नड आणि मराठी भाषा अवगत असणाऱ्या विद्वान अश्या या राजाने ‘सरस्वती महाल’ नावाचे वाचनालय जगभरातील ग्रंथ आणून समृद्ध केले.