बेळगाव लाईव्ह :केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात तसेच आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेळगाव जिल्ह्यातील शेतकरी आणि कामगारांनी संयुक्त आंदोलन -कर्नाटक बेंगलोरच्या बेळगाव जिल्हा समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली आज मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य इशारा मोर्चा काढून पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
संयुक्त आंदोलन -कर्नाटक बेंगलोरच्या बेळगाव जिल्हा समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या आजच्या मोर्चात शेतकरी व कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने करत शहरात काढण्यात आलेल्या या मोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयावर आवारात सांगता झाली.
त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नावे विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगारांच्या विरोधातील खाजगीकरण धोरणासह कॉर्पोरेट कंपन्यांच्या भांडवलशाहीला आळा घातला गेला पाहिजे.
त्याचप्रमाणे राज्य सरकारचे जनविरोधी धोरण आणि दोन्ही सरकारनी निवडणूक काळात शेतकरी व कामगारांना दिलेल्या आश्वासनासंदर्भात जाब विचारला गेला पाहिजे. आम्ही आत्ताच सावध होऊन आमच्या भवितव्यावरील कॉर्पोरेट कंपन्यांचे अतिक्रमण रोखले नाही तर भविष्यात आपले कांही खरे नाही. नव्या रूपातील गुलामगिरी आमच्या माथी मारली जाईल.
हे घडू नये यासाठी संपूर्ण देशातील शेतकरी संघटनांचा महासंघ म्हणजे ‘किसान संयुक्त मोर्चा’ आणि केंद्रीय कामगार संघटनांचा महासंघ तसेच इतर संघटनांनी पाठिंबा व्यक्त केला आहे. देशभरातील 500 जिल्ह्यांच्या केंद्राच्या ठिकाणी इशारा मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने बेळगाव जिल्हा समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून शेतकरी आणि कामगारांच्या मागण्यांचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे. आमच्या या मागण्यांची येत्या 3 महिन्यात पूर्तता झाली नाही तर उग्र आंदोलन हाती घेतले जाईल, अशा आशयाच्या तपशिलासह विविध 20 मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहेत.
संयुक्त आंदोलन -कर्नाटक बेंगलोरच्या बेळगाव जिल्हा समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या आजच्या इशारा मोर्चाला भारतीय कृषक समाज, कर्नाटक राज्य रयत संघ, सीआयटीयु, मानव बंधुत्व वेदिके, जमात -ए -इस्लाम, दलित संघर्ष समिती, सावली फाउंडेशन, स्वाभिमानी शेतकरी संघटना, कित्तूर कर्नाटक रक्षण वेदिके, लोरी लोडिंग -अन लोडिंग संघटना, कार्मिकर वक्कुट सौंदत्ती, बंडाय साहित्य वेदिके, हिंद के फरिश्ते वगैरे संघटनांनी संपूर्ण पाठिंबा देत मोठा सहभाग दर्शवला होता.