बेळगाव लाईव्ह:बेकायदा दारू विक्रीच्या गुन्ह्याखाली पोलिसांनी अटक केलेल्या एका आरोपीची बेळगाव येथील तिसऱ्या जेएमएफसी न्यायालयाने साक्षीदारातील विसंगतीमुळे निर्दोष मुक्तता केली आहे.
निर्दोष मुक्तता झालेल्या आरोपीचे नाव महेश रामा बसरीकट्टी (वय 45, रा. सावगाव, बेळगाव) असे आहे. याबाबतची माहिती अशी की, बेकायदा दारू विक्रीची खात्रीलायक माहिती मिळाल्याने बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी गेल्या 9 ऑक्टोबर 2019 रोजी सायंकाळी सात वाजता बेळगाव तालुक्यातील सावगाव येथील रामदेव गल्ली येथे धाड टाकली होती.
या धाडीत पोलिसांनी महेश रामाबसरी कट्टी याला पकडून झेडती घेतली. त्यावेळी आरोपी रामदेव गल्ली येथे सार्वजनिक ठिकाणी स्वतःच्या फायद्यासाठी सरकारकडून दारू विक्रीचा परवाना नसताना बेकायदा दारू विक्री करत असल्याचे निदर्शनास आले.
त्यावेळी त्याच्याकडील 10,287 रुपये किमतीची 26 लिटर दारू असलेल्या ट्रिपल एक्स दारूच्या बाटल्या आणि रोख 800 रुपये पोलिसांनी जप्त केले. त्यामुळे पंचांसमक्ष पंचनामा करून फिर्याद दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली व न्यायालयात हजर केले.
या खटल्याची सुनावणी होऊन बेळगाव येथील तिसऱ्या जीएमएफसी न्यायालयाने साक्षीदारातील विसंगतीमुळे आरोपी महेश रामा बसरीकट्टी याची निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपीच्यावतीने ॲड. मारुती कामाण्णाचे यांनी काम पाहिले.