Friday, December 27, 2024

/

केंद्राच्या विरोधात दलित संघर्ष समितीचा अर्धनग्न मोर्चा

 belgaum

बेळगाव लाईव्ह :केंद्र सरकार देशातील सीबीआय, ईडी, प्रसिद्धी माध्यम, आयकर विभाग वगैरे संविधानिक संस्थाचा दुरुपयोग करत असल्याच्या, त्याचप्रमाणे निधर्मी जनता दल आणि भारतीय जनता पक्षाचे नेते कुटील कारस्थान करून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना त्यांच्या पदावरून खाली खेचण्याचा प्रयत्न करत असल्याच्या निषेधार्थ आज कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीतर्फे शहरात अर्धनग्न मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

कर्नाटक राज्य दलित संघर्ष समिती बेळगाव जिल्हा शाखेच्यावतीने काढण्यात आलेल्या आजच्या या मोर्चात शहरासह जिल्ह्यातील बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते अर्ध नग्न अवस्थेत निदर्शने करत जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेला हा मोर्चा साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता.

केंद्र सरकार आणि राज्यातील भाजप व निजद नेत्यांच्या विरोधात कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीचे जिल्हा संचालक श्रीकांत तळवार संघटना संचालक संजय तळवळकर, कलाप्पा कांबळे, अमीन जातगार, रवी कांबळे, अनिल मोहिते आदींच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयावर आज सांगता झाली. त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.Dalit protest

याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीचे बेळगाव संचालक संजय तळवळकर म्हणाले की, केंद्र सरकार देशातील सीबीआय, ईडी, प्रसिद्धी माध्यम, आयकर विभाग वगैरे ज्या संविधानिक संस्था आहेत त्यांचा दुरुपयोग करत आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी कर्नाटक राज्यात लोकशाहीमध्ये लोकांकडून निवडून आलेले 136 आमदाराच्या पाठिंबावर या राज्याचे मुख्यमंत्री झालेले माननीय सिद्धरामय्या यांच्या विरोधात निधर्मी जनता दल आणि भारतीय जनता पक्षाचे नेते कुटील कारस्थान करत आहेत.

षडयंत्र रचून त्यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत. याच्या निषेधार्थ आमचे राज्याचे अध्यक्ष डॉ. डी. जी. सागर आणि जिल्हाध्यक्ष श्रीकांत तळवार यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही हा अर्ध नग्न मोर्चा काढला आहे.

या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही मनुवादी लोकांना आणि भाजपच्या नेत्यांना इशारा देऊ इच्छितो की पुन्हा पुन्हा जर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास राज्यातील जनता गप्प बसणार नाही. तुम्हाला जनतेने विरोधी पक्षात बसवले आहे, तेंव्हा तुम्ही तुमचे काम कायद्याच्या चौकटीत करा. ते सोडून तुम्ही षडयंत्र करण्याद्वारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मागे लागला तर आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाला माणणारे सर्वजण तुमच्या मागे लागू. भाजप व निजद नेते संविधानाच्या विरोधात कार्य करत आहेत आणि त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक दलाची फूस आहे. मात्र लक्षात घेतले पाहिजे की देवराज अरस यांच्यानंतर बहुजन समाजाचे कोण मुख्यमंत्री झाले असतील तर ते सिद्धरामय्या हेच आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंच हमी अर्थात गॅरंटी योजनांच्या माध्यमातून तळागाळापासून सर्व थरातील लोकांची काळजी घेतली आहे.

या पद्धतीने उच्च विचार आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून काम करणाऱ्या मुख्यमंत्र्याला हटवण्याचे काम केले जात आहे, जे खपवून घेतले जाणार नाही असे स्पष्ट करून राज्य चालवण्यास लायक नसल्यामुळेच भाजप आणि निधर्मी जनता दलाला जनतेने तिरस्कृत करून सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री केले आहे, असे दलित संघर्ष समितीचे बेळगाव संचालक संजय तळवळकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.