बेळगाव लाईव्ह: बेळगाव महापालिकेच्या अखत्यारीतील नागरी सेवकांना कष्ट भत्ता न दिल्याने मनपाचे सरकारनियुक्त नगरसेवक दिनेश नाशिपुडी यांनी अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला. महापालिकेच्या आवारात सफाई कर्मचाऱ्यांचा गणवेश परिधान करून स्वागतकक्षाची सफाई करत अनेकांचे लक्ष वेधून घेत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.
यासंदर्भात बोलताना दिनेश नाशिपुडी म्हणाले की, “गेल्या 20 महिन्यांपासून सफाई कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आलेले नाही. मनपा आयुक्त सफाई कर्मचाऱ्यांची काळजी घेत आहेत. मात्र काही कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून सफाई कर्मचाऱ्यांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात आहे.
2022-23 आणि 2023-24 या दोन वर्षांपासून महापालिकेने त्यांच्या मासिक पगाराचा मुद्दा प्रलंबित ठेवला आहे. जवळपास 20 महिन्यांपासून पगार न मिळाल्याने कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. महापालिकेच्या नूतन आयुक्तांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना पगार अदा करण्याचे आदेश दिले
, तरीही फाईल्स शोधणे, यादी तयार करणे यांसारख्या कारणांनी पगाराचा मुद्दा प्रलंबित ठेवून वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले जात आहे. सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी अंदाजे 2 कोटी 54 लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता असून सफाई कर्मचाऱ्यांना तातडीने त्यांचे वेतन दिले जाणे गरजेचे आहे.
जर सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन त्वरित अदा करण्यात आले नाही तर संबंधित अधिकाऱ्यांच्या घरासमोर साफसफाई करून निषेध नोंदवला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
दिनेश नाशिपुडी यांच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्येकडे अनोख्या पद्धतीने लक्ष वेधण्यात आल्याने गेल्या २० महिन्यांपासून वेतनापासून वंचित असणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यातून दिनेश नाशिपुडी यांचे कौतुक केले जात आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्कांचा मुद्दा ऐरणीवर आला असून याकडे दिनेश नाशिपुडी यांच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे.