Wednesday, November 27, 2024

/

मनपा आयुक्तांनी केला प्रभाग 27 चा पाहणी दौरा; जाणून घेतल्या समस्या

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिकेच्या नूतन आयुक्त शुभा बी. यांनी आज रविवारी सकाळी शहापूर प्रभाग क्र. 27 मधील आठवडी बाजार भरणाऱ्या ठिकाणासह समस्याग्रस्त भागांचा पाहणी दौरा करून तेथील विविध समस्या जाणून घेतल्या.

त्याचप्रमाणे संबंधित समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिल्यामुळे नागरिकात समाधान व्यक्त होत आहे.

सरकारी सार्वजनिक सुट्टीचा दिवस असूनही आज रविवारी सकाळी 9च्या सुमारास महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी शहापूर येथील प्रभाग क्र. 27 ला भेट दिली.

यावेळी स्थानिक नगरसेवक रवी साळुंखे यांच्यासह प्रभागातील प्रमुख नागरिक आणि मनपा आरोग्य अधिकारी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी व संबंधित अन्य अधिकारी उपस्थित होते. संपूर्ण प्रभागात फेरफटका मारणाऱ्या आयुक्त शुभा यांनी घरापर्यंत जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच संबंधित समस्या त्वरेने सोडवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले. पाहणी दौऱ्याप्रसंगी नगरसेवक साळुंखे यांनी महापालिका आयुक्तांना आपल्या प्रभागातील समस्यांची माहिती दिली.

शहापूर येथील दर रविवारी आठवडी बाजार भरणाऱ्या ठिकाणी आवर्जून भेट देत आयुक्तांनी तेथील अडचणी -समस्याही जाणून घेतल्या. सदर भाजी मार्केटमध्ये शेतकरी थेट शेतातून आणलेला भाजीपाला विकत असल्यामुळे येथे स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करणे आणि येथील सार्वजनिक स्वच्छतागृहांची व्यवस्थित देखभाल करणे ही जबाबदारी महापालिकेची असल्यामुळे याची कृपया दखल घेतली जावी, अशी विनंती यावेळी नगरसेवक रवी साळुंखे यांनी आयुक्तांकडे केली.Ravi salunke

त्यावेळी आयुक्त शुभा बी. यांनी सोबत असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना आठवडी बाजाराच्या ठिकाणी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करण्याबरोबरच तेथील अन्य समस्या त्वरेने सोडवण्याचा प्रामुख्याने सार्वजनिक स्वच्छतागृहांची व्यवस्थित देखभाल करण्याचा आदेश दिला.

एकंदर आजच्या पाहणी दौऱ्याप्रसंगी आयुक्त शुभा बी. यांनी आस्थेने सर्व समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचे ठोस आश्वासन दिल्यामुळे प्रभाग क्र. 27 मधील रहिवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.