बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेच्या कार्यालयात उभारलेली हायड्रोपोनिक ग्रीन वॉल दुर्लक्षित स्थितीत असून ती सध्या कचऱ्याचे केंद्र बनली आहे. सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी या परिस्थितीवर चिंता व्यक्त करत ग्रीन वॉलची योग्य देखभाल करावी, अन्यथा ती हटवून शासकीय शाळा, बाग किंवा रुग्णालयाला दान करावी, असे आवाहन केले आहे.
बेळगाव महानगरपालिकेच्या कार्यालयाच्या परिसरात पर्यावरण संवर्धनासाठी उभारण्यात आलेली हायड्रोपोनिक ग्रीन वॉल सध्या तंबाखूच्या पाकिटे, गुटख्याच्या कागदांपासून प्लास्टिक पिशव्यांच्या कचऱ्याने भरून गेली आहे. या ग्रीन वॉलच्या योग्य देखभालीसाठी कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याने ती उपयुक्ततेला मुकली आहे.
सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करत महापालिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी महापालिकेला पर्यावरणपूरक उपाययोजना करण्याचे आवाहन करत म्हटले की, जर महानगरपालिका ग्रीन वॉलची देखभाल करू शकत नसेल, तर ती शासकीय शाळा, बाग किंवा रुग्णालयाला दान करावी, जेथे तिचा योग्य उपयोग होईल.
दरेकर यांनी ग्रीन वॉलवर फुले किंवा हिरवळ वाढवून तिचे सौंदर्य आणि उपयोग वाढवण्याचा पर्यायही सुचवला आहे. त्यांनी असेही म्हटले की, परिसराचे सौंदर्य वाढवण्यासाठी आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी ग्रीन वॉलची योग्य देखभाल करणे गरजेचे आहे.
महानगरपालिकेने या विषयाची गंभीर दखल घेत ग्रीन वॉलचे योग्य व्यवस्थापन करावे, अशी अपेक्षा संतोष दरेकर यांनी व्यक्त केली आहे.