बेळगाव लाईव्ह : महापालिकेच्या ४६ कर्मचाऱ्यांच्या तडकापडकी बदली करून आयु्क्त शुभा बी. यांनी सर्जिकल स्ट्राईक केले आहे. त्यामुळे महापालिकेत एकच खळबळ माजली आहे. आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कामचुकार कर्मचाऱ्यांना चाप बसेल आणि वर्षोनवर्षे एकाच ठिकाणी दबा धरून बसलेल्या कर्मचाऱ्यांना चांगलाच धक्का बसला आहे.
आयुक्त शुभा यांनी गेल्या काही दिवसांत महापालिकेच्या विविध विभागांना अचानक भेटी दिल्या आहेत. त्यांनी त्या त्या विभागांतील कर्मचाऱ्यांची हजेरी तपासली होती. त्यामध्ये अनेक कर्मचारी कामचुकार असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे महापालिका आयुक्त शुभा यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
आयुक्तांनी अनेक वर्षे एकाच ठिकाणी काम करत असलेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या इतर विभागांत केल्या आहेत. त्यामध्ये आयुक्तांचे दोन स्वीय सहाय्यकांचाही समावेश आहे.
महापौरांच्या स्वीय सहाय्यकांचीही बदली केली आहे. याशिवाय आरोग्य विभाग, सामान्य प्रशासन विभाग, महसूल विभाग, कौन्सिल विभाग आदी ठिकाणच्या कर्मचाऱ्यांची बदली केली आहे. महापौरांच्या या धडक कारवाईमुळे एकच खळबळ माजली आहे.
तहसीलदार कार्यालयातील नुकताच झालेल्या एसडीसी आत्महत्या प्रकरणानंतर राज्य सरकारचे कर्मचारी बदलीच्या प्रकरणावरून चर्चेत आले होते. त्यानंतर आता पुन्हा बेळगाव महापालिकेतले कर्मचारी 46 जणांच्या एकदाच अंतर्गत झालेल्या बदल्यामुळे चर्चेत आले आहेत. एकूणच बेळगाव शहरातील राज्य सरकारचे कर्मचारी चर्चेत आहेत हे महत्त्वाचे आहे.