बेळगाव लाईव्ह:वक्फ कायद्यात मूळ हेतू बाजूला न सारता दुरुस्ती आणि सुधारणा आवश्यक आहे. मात्र सध्याच्या दुरुस्ती मसुद्यामध्ये अत्यंत चुकीचे मुद्दे घालण्यात आले असून सदर कायद्यात दुरुस्ती करण्यापूर्वी सरकारने वक्फ कायदे तज्ञांची बैठक बोलावून त्यांचा सल्ला घ्यावा अशी सूचना आम्ही केंद्र सरकारला केली आहे, अशी माहिती वक्फ बोर्डाच्या निवडणूकीतील उमेदवार ख्वाजा बंदे नवाज दर्गा सज्जादा नाशिन सय्यद मोहम्मद अली हुसैनी यांनी दिली.
वक्फ बोर्डाची निवडणूक लढवत असलेले ख्वाजा बंदे नवाज दर्गा सज्जादा नाशिन सय्यद मोहम्मद अली हुसैनी त्या संदर्भातील प्रचारासाठी बेळगाव शहरात आले आहेत. यानिमित्ताने आज बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. बेळगाव जिल्ह्यातील समस्त मतदारांना माझे आवाहन आहे की उत्तम मतदार कोण होऊ शकतो याचा प्रथम विचार करा. तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर मला तुमची सेवा करण्याची संधी द्या. कारण समाजाची सेवा करणे हेच माझे ध्येय आहे. माझ्या गुरूंनी मला ही समाजसेवेची शिकवण दिली असून त्याच उद्देशाने व गुरूंच्या आशीर्वादाने मी मार्गक्रमण करत आहे. तेंव्हा तुम्ही निर्णय घेऊन मला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
केंद्र सरकारने वक्फ कायद्यात दुरुस्ती करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्या संदर्भात बोलताना वक्फ कायद्यात दुरुस्तीसंदर्भातील मसुद्यामध्ये अत्यंत चुकीचे मुद्दे घालण्यात आले आहेत. त्यावर आम्ही रीतसर आक्षेप नोंदवला आहे. वक्फ कायदा हा मुस्लिम समाजाच्या हित व भल्यासाठी करण्यात आला असून त्यालाच जर बाधा निर्माण होणार असेल तर त्या कायद्याला काहींच अर्थ नाही.
याबाबत देशभरातून तक्रारी गेल्या आहेत. वक्फ कायद्यातील दुरुस्तीसंदर्भात केंद्र सरकारने वक्फ कायदे तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि त्यासाठी त्यांची बैठक बोलावून चर्चा करावी अशी विनंती आम्ही सरकारला केली आहे. या कायद्याला अनावश्यक बाधा पोहोचणार नाही असा सकारात्मक दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे. वक्फ कायद्यात दुरुस्ती होऊन त्यात सुधारणा होणे देखील आवश्यक आहे.
कारण सदर कायद्यात कांही अशा तरतुदी आहेत की त्यामुळेच आजची ही समस्या निर्माण झाली आहे. वक्फ कायद्याच्या विरोधात देशात वादळ उठवण्यात आले असले तरी आपण त्याला संघटितपणे तोंड दिले पाहिजे. वक्फ कायद्याच्या विरोधात अनेकांनी आक्षेप नोंदवले सूचना केल्या. मात्र सर्वांचे आक्षेप आणि सूचना जवळपास एकच आहेत. आपली विचारधारा अशी असली पाहिजे की आपण सर्वांनी एकाच व्यासपीठावरून आवाज उठवला पाहिजे. आपला समाज एखाद्या मोठ्या मुद्द्याबाबतीतच एका व्यासपीठावर येतो अन्यथा येत नाही.
हे वक्फ कायद्याच्या बाबतीत न करता सर्वांनी एकाच व्यासपीठावरून आवाज उठवला पाहिजे. कारण सदर कायद्यात दुरुस्ती हा फार मोठा मुद्दा असून आपण सर्वांनी त्याच्या विरोधात संघटित होऊन आवाज उठवणे काळाची गरज आहे, असे ख्वाजा बंदे नवाज दर्गा सज्जादा नाशिन सय्यद मोहम्मद अली हुसैनी यांनी शेवटी स्पष्ट केले.