बेळगाव लाईव्ह : राज्य सरकारच्या बोगस बीपीएल कार्ड रद्द मोहिमेनंतर आता कामगार खात्याने बोगस लेबरकार्डे शोधून ती रद्द करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईत बेळगाव जिल्ह्यात 1,778 बोगस लेबरकार्डे आढळून आली असून ती रद्द करण्यात आली आहेत.
कामगार कल्याण मंडळामार्फत बांधकाम कामगारांसाठी दिल्या जाणाऱ्या विविध सुविधांचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. कामगार खात्याच्या तपासात 1,778 बोगस कार्डे सापडली, ज्यामुळे मूळ कामगारांना मिळणाऱ्या सुविधा बोगस नोंदणीधारकांनी बळकावल्याचे समोर आले आहे .
कामगार खात्याने मागील वर्षीपासून सॉफ्टवेअर प्रणालीद्वारे बोगस अर्ज आणि कार्डे शोधण्यासाठी कारवाई सुरू केली आहे. कामगारांनी वार्षिक नूतनीकरणासाठी 90 दिवस बांधकाम कामात सक्रिय असण्याचे निकष पूर्ण करणे बंधनकारक आहे. नवीन अर्जांची देखील सखोल तपासणी केली जात आहे.
कामगार कल्याण मंडळ विविध प्रकारच्या मदतीसाठी कार्यरत आहे, ज्यात शैक्षणिक मदत, अपघातग्रस्त कामगारांना आर्थिक मदत, मृत्यूनंतर कुटुंबाला आधार, आणि विवाहासाठी सहाय्य यांचा समावेश आहे.
मात्र, बोगस कार्डधारकांमुळे या सुविधांवर गंडा बसत असल्याने मूळ कामगारांचे हक्क दडपले जात होते. या मोहिमेमुळे बोगस नोंदणी बंद होईल आणि योग्य लाभार्थ्यांना न्याय मिळेल, अशी खात्री कामगार खात्याने व्यक्त केली आहे.