बेळगाव लाईव्ह : वक्फ बोर्ड प्रकरणी भाजपने आक्रमक पवित्रा घेत राज्यभरात आंदोलने उभी केली असून आज बेळगावमध्येही भाजपचे आजी – माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांच्या सहभागातून आंदोलन पुकारण्यात आले. वक्फ मंडळ रद्द करण्यात यावे अशी मागणी करत राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली.
यावेळी वक्फ मंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनीवर हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत बेळगाव शहरातील सरदार मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “आपली जमीन – आपला हक्क” या घोषवाक्यासह भव्य आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाजप नेत्यांनी राज्यातील काँग्रेस सरकारवर जोरदार टीका केली. राज्य सरकार भ्रष्टाचारात बुडाले आहे. अनेक शासकीय कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांना राज्य सरकार जबाबदार असून आता वक्फ बोर्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनींवर कब्जा करण्याचे षडयंत्र सुरू आहे.
शेतकऱ्यांना दिलेल्या नोटिसा त्वरित मागे घ्याव्यात आणि अशा प्रकारच्या कारवाया थांबवाव्यात. अशी मागणी यावेळी करण्यात आली. काँग्रेस सरकारने नेहमीच अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण करण्याचे धोरण राबविले आहे. हमी योजना अयशस्वी ठरत असल्यामुळे बीपीएल कार्ड रद्द करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अशा भ्रष्ट सरकारने पायउतार व्हावे, मुख्यमंत्री सिध्दरामय्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली.
यावेळी माजी आमदार अनिल बेनके, संजय पाटील, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, महिला नेत्या उज्वला बडवाण्णाचे, डॉ. सोनाली सरनोबत यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.