Friday, December 27, 2024

/

एसडीसी आत्महत्या प्रकरणी मंत्री आमदारांचे स्पष्टीकरण

 belgaum

बेळगाव लाईव्ह : तहसीलदार कार्यालयातील एसडीए रुद्रेश यांच्या आत्महत्या प्रकरणात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची कोणतीही भूमिका नाही, असे विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी केले.

बेळगावच्या कुवेंपू नगरात बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना चन्नराज हट्टीहोळी यांनी सांगितले की, रुद्रण्णाचे व्हॉट्सॲप चॅट त्यांनी पाहिले असून, आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. पोलीस विभागाकडून अशा प्रकारची कोणतीही माहिती मिळालेली नाही. दुर्दैवाने त्याने आत्महत्या केली. रुद्रण्णाच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आणि सरकार त्यांच्याशी आहोत, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली.

चन्नराज हट्टीहोळी यांनी भाजपच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, भाजपला आंदोलन करण्याची मुभा आहे, परंतु ते काय मुद्दे उचलतात, हे समजत नाही. त्यांनी ईश्वरप्पा प्रकरणातील संतोषच्या आत्महत्येचा संदर्भ घेत, राजीनाम्याची मागणी केली असावी. मात्र लक्ष्मी हेब्बाळकर यांना रुद्रण्णा कोण हे देखील माहीत नव्हते असे ते म्हणाले.

रुद्रण्णा यांच्या आत्महत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, असा विश्वास लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केला असून राजकीय हेतूने काही तक्रारी करण्यात येत आहेत, असा टोला विरोधकांना त्यांनी लगावला. ते पुढे म्हणाले, रुद्रण्णाला न्याय मिळवून देण्यासाठी भाजपला लढू द्या, या प्रकरणाच्या तपासात संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.Laxmi

डेथनोट’मध्ये नोंद असलेल्या नावामुळे ग्रामीण आमदारांवर संशयाची सुई!
स्वीय सचिवांचे नाव आल्याने गोंधळ.. मात्र याप्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी : मंत्री हेब्बाळकर

बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या तहसीलदार कार्यालयात एसडीए रुद्रण्णा याडवण्णावर यांनी केलेल्या आत्महत्येनंतर एकच खळबळ माजली असून त्यांनी मृत्यूपूर्वी डेथ नोटमध्ये महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या स्वीय सचिवांच्या नावासह इतर नावाचाही उल्लेख केला आहे. याप्रकरणी मंत्री हेब्बाळकर यांच्या स्वीय सचिवांच्या नावाचा उल्लेख केल्याने मंत्र्यांवर आरोप होत असून याप्रकरणी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, असे सांगितले.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, एसडीए रुद्रण्णा यांना आम्ही तहसीलदार कार्यालयात कधीही भेटलो नाही. अशा घटना घडू नयेत. काल झालेल्या प्रकारची माहिती मलाही माध्यमांतून मिळाली. दिवसभरातील व्यस्त कामे, मंत्री एच. के. पाटील यांच्यासमेवत पाहणी दौरा यात आपण व्यस्त होतो. आत्महत्या प्रकरणी पोलीस तपास सुरु आहे. आपल्या स्वीय सचिवांच्या नावाचा उल्लेख का झाला याची आपल्याला माहिती नाही. प्रसारमाध्यमांमध्ये पाहिल्यानंतर हे आपल्याला कळले आहे. आजवर रुद्रण्णाशी कोणत्याही कामासाठी संपर्क साधला नाही. त्यांनी केलेल्या आत्महत्या प्रकरणी प्राथमिक तपास सुरू झाला आहे. एखाद्या मंत्र्याकडे 10-15 पीए असणे स्वाभाविक आहे. आम्ही फील्ड वर्क आणि इतर कामांसाठी पीए नियुक्त केले आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. रुद्रण्णा यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत.

रुद्रण्णा यांच्या डेथ नोटमध्ये आपल्या स्वीय सचिवांचे नाव आहे. परंतु एका फोन कॉल च्या रेकॉर्डिंग मध्ये त्यांनी आपल्या नावाचा उल्लेख करत मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा आपल्याशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. रुद्रण्णाच्या आत्महत्या प्रकरणाची नि:पक्षपातीपणे चौकशी व्हावी, अशी माझी इच्छा आहे. मी पोलीस अधिकारी आणि जिल्हा आयुक्तांच्या सतत संपर्कात आहे. याप्रकरणी विरोधक राजकारणी राजकारण करत असून यामागचे सत्य लवकरात लवकर बाहेर येऊन रुद्रण्णा यांच्या कुटुंबाला न्याय मिळू दे अशी अपेक्षा मंत्री हेब्बाळकर यांनी व्यक्त केली.

डेथ नोट मध्ये आपल्या सचिवांचे नाव आहे. मात्र लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नावाचा कुठेही उल्लेख आहे की नाही हे समजून घेतले पाहिजे. रुद्रण्णा यांनी लक्ष्मी हेब्बाळकर असा कुठे उल्लेख केला आहे का? याप्रकरणाचा माजी मंत्री ईश्वरप्पा यांच्या प्रकरणाशी संबंध जोडला जात आहे. मात्र ईश्वरप्पांचे आणि हे प्रकरण वेगवेगळे आहे. ईश्वरप्पा यांच्या नावाचा उल्लेख त्यांच्या प्रकरणात थेट करण्यात आला होता. आता रुद्रण्णा यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांचा मोबाईल आणि पुरावे मिळायला हवेत, तपास सुरु आहे. यादरम्यान कोणतेही वक्तव्य करणे चुकीचे आहे. याप्रकरणी हवे ते सहकार्य करण्यासाठी आपण तयार आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केली.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.