बेळगाव लाईव्ह : खडक गल्ली, बेळगाव येथील माजी क्रिकेटपटू आणि सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जाधव यांच्या कन्या स्वरांजली आणि गीतांजली यांना भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) प्रशिक्षणामध्ये ‘सर्वोत्कृष्ट अष्टपैलू कॅडेट’ म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.
पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील वैकुंठफूर येथे आज शनिवारी बीएसएफच्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांचा दीक्षांत सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्यात बीएसएफच्या महासंचालकांच्या हस्ते स्वरांजली आणि गीतांजली जाधव यांना ‘सर्वोत्कृष्ट अष्टपैलू कॅडेट’ म्हणून पुरस्कार देण्यात आले.
स्वरांजली आणि गीतांजली जाधव यांचे शालेय शिक्षण बेळगावमधील विविध शाळांमध्ये पूर्ण झाले आहे. गीतांजली हिने टिळकवाडीतील डिव्हाईन प्रॉव्हिडन्स कॉन्व्हेंट स्कूलमधून शालेय शिक्षण घेतले, तर स्वरांजलीने सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूलमधून शिक्षण घेतले.
दोघीही लिंगराज महाविद्यालयातून उच्च शिक्षण घेऊन आपल्या शालेय जीवनातील यशाची परंपरा कायम ठेवत आहेत. गीतांजली ही कला शाखेची पदवीधर असून तिने इंग्रजी विषयात (86 टक्के गुण) बीएची पदवी मिळविली आहे. त्याचप्रमाणे स्वरांजली हिने 93 गुणांसह अर्थशास्त्र हा प्रमुख विषय घेऊन पदव्युत्तर पदवी (एमए) संपादन केली आहे.
खडक गल्ली येथील प्रतिष्ठित नागरिक सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जाधव व शुभदा शिवाजी जाधव यांच्या कन्या, तसेच विश्व हिंदू परिषदेचे स्थानिक नेते विजय सदाशिव जाधव यांच्या पुतण्या असलेल्या स्वरांजली व गीतांजली यांना सीमा सुरक्षा दलातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाल्याची बातमी खडक गल्लीमध्ये धडकताच आनंदाचे वातावरण पसरून घरोघरी जाधव भगिनींचे कौतुक होत आहे.
त्याचप्रमाणे खडक गल्ली येथे स्वरांजली व गीतांजली यांच्या स्वागत आणि अभिनंदनची जय्यत तयारी करण्यात येत आहे. स्वरांजली आणि गीतांजली जाधव यांच्या या अभूतपूर्व यशामुळे खडक गल्ली, बेळगावमधील जाधव कुटुंबावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.