बेळगाव लाईव्ह : ‘सरकारी काम आणि बारा महिने थांब’ अशी अवस्था सध्या प्रत्येक कार्यालयात पाहावयास मिळते. दरम्यान तालुक्याचा कारभार सांभाळणाऱ्या तालुका पंचायत कार्यालयात अनागोंदी कारभार सुरू झाला आहे. दरम्यान येथील अस्वच्छता पाहून एका वरिष्ठ जुन्या अधिकाऱ्याने तेथील कचरा स्वच्छ केल्याचा प्रकार नुकतीच घडला आहे.
सध्या तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी म्हणून रमेश हेडगे रुजू झाले आहेत. मात्र कामापेक्षा व्याप जास्ती असे भासवत त्यांनी कार्यालयाकडे दुर्लक्ष केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान याबाबत वारंवार काहींना सूचना केल्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा प्रकार दिसून आला आहे.
अलीकडेच एका वरिष्ठ अधिकाऱ्याने तालुका पंचायत कार्यालयाचा फेरफटका मारला असता तेथील अस्वच्छता पाहून संबंधित अधिकाऱ्याने डोक्यावर हात मारून घेत तातडीने आपल्या सहकाऱ्यांना व संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावून तेथील कचरा स्वच्छ करण्यास सांगितले.
हा सारा प्रकार दोन दिवसांपूर्वीच घडला आहे. मात्र याचे सोयरसुतक कोणालाच नसल्याचे दिसून आले. बेळगाव तालुका पंचायतमध्ये सध्या मनमानी कारभार सुरू असल्याच्या तक्रारी दिसून येत आहेत.
या साऱ्या प्रकारामुळे येथील कर्मचारी वर्ग नाराजी व्यक्त करत असून एका वरिष्ठ अधिकाऱ्याने तालुका पंचायतीतील कचरा काढणे म्हणजे नवीन अधिकाऱ्यांसाठी लाजिरवाणीच गोष्ट आहे, अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
येथील अनागोंदी कारभार आणि एकंदर वातावरण पाहता याकडे कार्यकारी अधिकारी लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यापूर्वी तालुका पंचायतीचा कार्यभार मागील अधिकाऱ्यांनी व्यवस्थित सांभाळला होता. आता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबवली आहे. मात्र विद्यमान कार्यकारी अधिकाऱ्यांनी याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, याबाबत जुन्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तालुका पंचायतीमधील काही कर्मचाऱ्यांना सूचना केल्या आहेत. आता या सूचना किती गांभीर्याने पाळल्या जाणार आहेत, याकडे तालुका पंचायत कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह सर्वांचेच लक्ष वेधले आहे.