बेळगाव लाईव्ह :गेल्या कांही दिवसांपासून बेळगाव परिसरात थंडीचा जोर वाढला असून रात्रीच्या तापमानात घट झाल्याने सकाळी वातावरणात विशेष थंडी जाणवत आहे. थंडी रब्बी हंगामातील पिकांसाठी लाभदायक व पोषक असल्यामुळे बेळगाव परिसरात रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे.
पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे भात कापणी नंतर ग्रामीण भागात कडधान्ये पेरणीला प्रारंभ झाला आहे. पूर्व भागातील हलगा शिवारात तडपाल पेरणीला सुरुवात करण्यात आली असून शेतकरी पेरणीत गर्क असल्याचे पहावयास मिळत आहे.
बेळगाव परिसरात हिवाळ्यात विशेषत: थंडीमध्ये कडधान्य पिकवली जातात. थंडीत ज्वारी, हरभरा, मसूर, वाटाणा आणि मोहरी इत्यादी पिके घेतली जातात. सुगीचा हंगाम सुरू असल्याने शहर परिसरासह ग्रामीण भागातील सर्व शिवारांमध्ये सध्या शेतकरी लगबग वाढली आहे.
रब्बी पिकं तीन महिन्याची असतात, जी बेळगाव परिसरातील शिवारात मोठ्या प्रमाणात पिकवली जातात. ऑक्टोबर अखेरपर्यंत झालेल्या परतीच्या पावसाने निर्माण झालेल्या जमिनीतील ओलाव्यामुळे यंदा रब्बीची पेरणी चांगली साधली आहे. रब्बी पिकांना सध्या पडणारी थंडी अनुकूल ठरली आहे.
सकाळी आरोग्याच्या दृष्टीने उत्साहावर्धक असलेल्या थंडीचा आनंद घेण्यासाठी मॉर्निंग वाॅक करणाऱ्या स्त्री-पुरुष व वृद्धांच्या संख्येत वाढ झाली आहे. रात्रीच्या तापमानात झपाट्याने घसरण झाल्यामुळे सायंकाळनंतर विशेष गारवा निर्माण होत आहे. थंडीमुळे रब्बी हंगामात उत्पादनात वाढ होईल या आशेने शेतकरी सुखावला आहे.