Friday, November 1, 2024

/

दंडेलशाहीला सणसणीत चपराक

 belgaum

बेळगाव लाईव्ह : केंद्र सरकारने १९५६ साली केलेल्या भाषावार प्रांतरचनेत बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांना अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आले. त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समिती १ नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळत आली आहे. आजही समितीने काळा दिन गांभीर्याने पाळून केंद्र सरकारने आपल्यावर केलेल्या अन्यायाचा निषेध केला.

काळ्यादिनाच्या फेरीत संयुक्त महाराष्ट्राचा गजर करण्यात आला. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार झाला. कर्नाटकी अत्याचाराविरोधात, बेळगावच्या नामांतराविरोधात, मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भगवे आणि काळे ध्वज लोकांचे लक्ष वेधून घेत होते. तर विविध घोषणांचे फलकही दर्शवण्यात आले होते. महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते ठिकठिकाणी थांबून होते. युवा वर्गाच्या मोठ्या सहभागामुळे संपूर्ण निषेध फेरीत चैतन्य निर्माण झाले होते.

जिल्हा प्रशासन आणि पोलिसांची दडपशाही झुगारून हजारो युवकांनी काळ्या दिनी निषेध फेरीत सहभाग घेऊन झंझावात दाखवला. या फेरीतून मराठी जनतेच्या लढ्याला नवचैतन्य आल्याचे दिसून आले. त्यामुळे कर्नाटकी दंडेलशाहीला सणसणीत चपराक बसली. महाराष्ट्र एकीकरण समितीने पंधरा दिवसांपूर्वी 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळून केंद्र सरकारला मराठी जनतेच्या भावना दर्शवण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. पण, दरम्यानच्या काळात पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र एकीकरण समितीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. यंदा काळ्यादिनाच्या फेरीला परवानगी देण्यात येणार नाही. काळादिन पाळता येणार नाही, राज्योत्सव झाल्यानंतर काळा दिन पाळा, काळादिन पाळल्यास कारवाई करू, असा इशारा शेवटच्या दिवसापर्यंत दिला. पण, गेल्या 68 वर्षांपासून महाराष्ट्रात जाण्याची इच्छा व्यक्त करणार्‍या मराठी माणसाने प्रशासनाच्या धमकीला न जुमानता मोठ्या संख्येने फेरीत सहभागी होऊन फेरी यशस्वी करून दाखवली.Black day

आज सकाळी सात वाजल्यापासूनच संभाजी उद्यान येथे पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. मैदानातच शंभरभर पोलिस थांबून होते. अधिकारी पोलिसांना लाठ्या घेऊन या, चोख बंदोबस्त राखा, अशा माईकवरून सूचना करत होते. मराठी जनतेवर दबाव घालण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात येत होता. पण, सकाळी 9 नंतर कार्यकर्ते जमण्यास सुरवात झाली. साडे नऊ वाजता फेरीला सुरुवात झाली. या फेरीत लहान मुले, महिला, युवक आणि इतर कार्यकर्ते, नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
धर्मवीर संभाजी उद्यान येथून फेरीला सुरुवात झाली. त्यानंतर विविध मार्गाने फिरून मराठा मंदिरपर्यंत फेरी काढण्यात आली.

या फेरीवर कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे उपायुक्त जगदीश रोहन, एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो पोलिसांचा बंदोबस्त होता.

महाराष्ट्रातील नेत्यांनी फिरवली पाठ ! जाहीरनाम्यात उल्लेख नाही –ऐन विधानसभा निवडणुकीत सीमा भागातील काळा दिनाच्या निषेध फेरीत महाराष्ट्रातील नेत्यांनी पाठ फिरवली. कोल्हापूर शिवसेनेचे विजयने वगळता कुणीही सीमा भागात त्याचा प्रयत्न देखील केला नाही. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांना पत्र लिहून निवडणूक जाहीरनाम्यात सीमा प्रश्नाचा उल्लेख करा अशी मागणी केली होती मात्र सर्वच राजकीय पक्षांनी याकडे दुर्लक्ष केल्याने काळात दिनाच्या सायकलीत खंत व्यक्त करण्यात आली.

युवकांचा सक्रिय सहभाग – दिवाळी सण असला तरी काळा दिनाचा निषेध करीत हजाराच्या संख्येने मराठी भाषेने सहभागी होत मराठी अस्मितेचे दर्शन घडविले आणि महाराष्ट्रात जाण्याची तळमळ दाखवली. 1956 ते 2024 हा 68 वर्षाचा लढा वयाने मोठा असला तरी आजच्या निषेध फेरीत 80% युवकांची संख्या होती त्यामुळे सीमा लढा वरिष्ठानकडून युवकाकडे संक्रमित होत आहे असे चित्र दिसले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.