Thursday, November 7, 2024

/

अन्यथा राष्ट्रीय महामार्ग रोखू : मन्नत नगरमधील नागरिकांचा इशारा

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील महांतेश नगर येथील मन्नत नगर मध्ये सुविधांची वानवा आणि रस्त्याची बिकट दुरावस्था झाल्याने येथील नागरिकांनी संताप व्यक्त करत, महापालिकेने आठवडाभरात मन्नत नगरमधील ड्रेनेज आणि रस्त्याच्या समस्येचे समाधान केले नाही, तर महांतेश नगरजवळ राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा मन्नत नगरच्या रहिवाशांनी दिला आहे.

किल्ला तलावासमोरील मन्नत नगर हे अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. कणबर्गी सर्कलवरील मुख्य रस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांना कोणतीही शासकीय सुविधा मिळत नसल्यामुळे त्यांनी महापालिका आणि स्थानिक आमदारांवर संताप व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी मुख्य रस्त्यावर बिअर बार सुरू झाल्याने बारचे सांडपाणी रस्त्यावर सोडले जात आहे. आधीच खराब झालेल्या रस्त्याच्या खड्ड्यांत सांडपाणी साचले असून, संपूर्ण रस्ता गाळाने व्यापला आहे. यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

येथील सुविधांच्या अनुपलब्धतेमुळे महिला आणि लहान मुलांसाठी अवघड परिस्थिती निर्माण झाली असून याबाबत बोलताना येथील रहिवाशांनी सांगितले की, महिलांना, लहान मुलांना आणि शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या रस्त्यावरून जाणे खूप कठीण झाले आहे. याशिवाय, रस्त्यावर लाईटची व्यवस्था नसल्यामुळे अंधारात जुगार व गांजा सेवन सारखे अवैध धंदे सुरु होत आहेत, ज्यामुळे स्थानिक नागरिक असुरक्षिततेची भावना व्यक्त करत आहेत. याबाबत अनेक वेळा महापालिका आणि स्थानिक आमदारांना शासकीय सुविधांची मागणी केली आहे, पण त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही. या भागात सर्वात उंच तिरंगा उभारण्यात आला आहे. मात्र याच भागातील मन्नत नगरची ही दुरावस्था आहे. महापालिकेने तातडीने इथली समस्या सोडवावी, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.Mannt nagar

येथील महिलांनीही रस्त्याच्या दुरावस्थेवर नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्यावरील खड्डे आणि सांडपाणी यामुळे आपल्या भागात कोणतेही दळणवळणाचे साधन उपलब्ध होऊ शकत नाही. रिक्षा देखील येऊ शकत नाहीत. मुलांना घाणीतून उचलून रिक्षापर्यंत सोडावे लागते. सांडपाणी आणि रस्त्याच्या दुरावस्थेबाबत महिला नाराजी व्यक्त करत संबंधितांनी या समस्येवर तातडीने लक्ष देऊन, त्याचे निराकरण करावं अशी मागणी येथील महिलांनी केली.

मन्नत नगरमधील समस्यांवर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. रस्त्याची दुरावस्था आणि सांडपाणी यामुळे नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षितता धोक्यात आली असून महापालिकेने आणि स्थानिक प्रशासनाने लवकरच यावर कार्यवाही करावी. आठवडाभरात या भागातील समस्या सोडवली गेली नाही, तर महांतेश नगरजवळ राष्ट्रीय महामार्ग रोखून आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे. जर लवकरच या समस्यांचे निराकरण करण्यात आले नाही, तर आंदोलनाची शक्यता नाकारता येणार नाही.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.