Saturday, November 16, 2024

/

गांजा विक्री, सेवनाविरुद्ध ऑटो चालकांनी उठवला आवाज

 belgaum

बेळगाव लाईव्ह :अंमली पदार्थ (गांजा) सेवन आणि विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याबरोबरच त्यासंबंधीचा कायदा मजबूत करावा, या मागणीसाठी बेळगावच्या ऑटो रिक्षा मालक व चालक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले.

शहरातील एससी मोटर्स जवळ एका प्रवाशाने गांजासंदर्भात ऑटो रिक्षा चालकावर चाकूने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना नुकतीच घडली. या पार्श्वभूमीवर ऑटो रिक्षा चालक व मालक संघटना बेळगावचे अध्यक्ष मन्सूर होनगेकर उपाध्यक्ष गौतम कांबळे व सरचिटणीस अब्दुल मेस्त्री यांच्या नेतृत्वाखाली आज शनिवारी सकाळी शहरातील ऑटो रिक्षा चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. शहर परिसरातील मशाबाजी बंद करा, गांजा विक्री बंद करा, गांजा विक्री व सेवन करणाऱ्यांवर कारवाई करा या मागणीच्या घोषणा देत करण्यात आलेल्या या मोर्चात बहुसंख्य ऑटोरिक्षा चालक सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मोर्चाची सांगता होऊन त्या ठिकाणी निवेदन सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या (डीसी) सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. शहरातील एससी मोटारनजीक आमचा सहकारी ऑटो चालक रियाज अहमद ताशिलदार (वय 55, रा. उचगाव बेळगाव) याला प्रवासी नशेखोर गुन्हेगार अलीम खान अयुब खान पठाण (रा. न्यू गांधीनगर) याने चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. त्यामुळे रियाज याच्यावर केएलई हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. याखेरीस बेळगाव शहरात प्रत्येक स्थानिक भागात कोपऱ्या कोपऱ्यावर युवक रात्री उशिरापर्यंत तंबाखू खात सिगारेट ओढत किंवा गांजाचे सेवन अथवा विक्री करत बसलेले असतात.

ज्यांच्याशी रात्रपाळी करणारे ऑटो रिक्षा चालक आणि कामगार कर्मचाऱ्यांचा दररोज एखाद दुसरा वाद होत असतो. गांजा विक्री आणि सेवन करणारे, सिगारेट फुकत बसणारे अशा लोकांमुळे भावी युवा पिढीवर परिणाम होत असून बेळगाव शहरातील शांतता व सौहार्दतेला बाधा पोहोचत आहे. तरी याची गांभीर्याने दखल घेऊन कायदा मजबूत करण्याबरोबरच या लोकांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशा आशयाचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सरचिटणीसांसमवेत रफिक देवलापूर, अजीम मुल्ला, अब्दुल खादर शेख, मलिक मुल्ला, मुन्ना हवालदार, संगाप्पा जी. वगैरे संघटनेचे अन्य पदाधिकारी व बहुसंख्य ऑटो रिक्षाचालक उपस्थित होते.Auto drivers

याप्रसंगी बोलताना ऑटो रिक्षा चालक रशीद मुजावर यांनी सांगितले की, आमच्यापैकी अनेक ऑटो रिक्षा चालकांची घरची परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे त्यांना पैसे कमावण्यासाठी बऱ्याचदा दिवस -रात्र आपली रिक्षा चालवावी लागते. आमच्या रात्रपाळी करणाऱ्या सहकारी ऑटो रिक्षा चालकाच्या बाबतीत परवा जी घटना घडली त्याला शहरात वाढलेली नशाबाजी कारणीभूत आहे. त्यामुळे ड्रग, गांजा, दारू वगैरे नशाबाजीला पोलीस प्रशासनाने आळा घालून ऑटो रिक्षा चालकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करावे. कारण परवाच्या घटनेत गंभीरित्या जखमी झालेला संबंधित ऑटो रिक्षा चालक मार्केट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला नसता तर तो प्रचंड रक्तस्त्रावामुळे जगलाच नसता.

घरच्या गरिबीच्या परिस्थितीमुळेच ऑटो रिक्षा चालकांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी नाईलाजाने रात्रपाळी करावी लागते. अशा परिस्थितीत त्यांच्यावर हल्ले होऊ लागले तर त्यांचा जीव कसा सुरक्षित राहील? तेंव्हा परवा घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्याद्वारे फक्त रिक्षाचालक नाहीतर सर्वसामान्य जनतेसाठी शहरात सुरक्षित वातावरण निर्माण करावे. नशेखोर माणसं पैशासाठी काहीही करू शकतात हे ध्यानात घेऊन पोलीस प्रशासनाने आमच्या बेळगावला सुरक्षित कराव, एवढीच आमची मागणी आहे असे मुजावर यांनी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.