Saturday, November 16, 2024

/

बेळगाव शहरातील वड्डरवाडी महिलेवर प्राणघातक हल्ला

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील वड्डरवाडी परिसरात जमिनीच्या वादातून एका विवाहित महिलेसह तिच्या आईवर काहीजणांनी घरात घुसून प्राणघातक हल्ला करत वेश्याव्यवसायाचा खोटा आरोप करून त्या महिलांना विवस्त्र करण्याचा प्रयत्न करण्याचा अमानुष प्रकार घडला आहे. याप्रकरणानंतर येथील वातावरण तणावग्रस्त बनले असून पीडित महिलेच्या घराजवळ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बेळगाव शहरातील माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वड्डरवाडी येथे हि घटना घडली आहे. पीडित विवाहित महिलेने पत्रकारांसमोर घडल्या प्रकाराची माहिती देताना सांगितले कि, काही स्थानिकांनी देवस्थानासाठी तिच्या घराची जमीन बळकावण्याच्या हेतूने तिला आणि तिच्या आईवर वेश्याव्यवसायाचा खोटा आरोप लावत अपमानित केले आहे.

घराच्या जागेवर कब्जा करण्यासाठी हा कट रचण्यात आला असून वारंवार खोटे आरोप लावून कुटुंबाला त्रास देण्यात येत आहे. आज विवस्त्र करून, अमानुष मारहाण करण्यात आली असून यामुळे संपूर्ण कुटुंब भयभीत झाले आहे. सदर महिलेच्या कुटुंबात केवळ महिला आणि मुलीच राहात असून आपल्या कुटुंबाला धोका असल्याचे पीडित महिलेने सांगितले.

या हल्ल्यात इंद्रा अष्टेकर, हुवाप्पा अष्टेकर आणि मणीकंठ अष्टेकर या संशयितांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हुवाप्पा अष्टेकर यांनी पीडितेच्या आईला घराबाहेर फरफटत नेऊन मारहाण केली. याप्रकरणी माळमारुती पोलिसांकडे वारंवार तक्रारी केल्यानंतरही पोलिसांकडून दखल घेण्यात आली नाही. येथील पोलिसांनी स्थानिक पंचांसमवेत तडजोड करण्याचा सल्ला दिला, असा आरोपही पीडित महिलेकडून करण्यात आला.Waddarwadi

या घटनेनंतर, पीडित महिलेसह तिच्या आईला भेटण्यासाठी बेळगाव उत्तरचे आमदार असिफ (राजू) सेठ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महिलेला आणि तिच्या कुटुंबाला दिलासा देत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. याचप्रमाणे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनीहि पीडित महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेत, महिलेकडून वेश्याव्यवसायाचे खोटे आरोप लावून हल्ला केल्याच्या तक्रारीनुसार आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या घटनेची दखल शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानीयांग यांनीही घेतली असून पीडित महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन घडल्या प्रकाराची माहिती जाणून घेतली. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार संशयित आरोपींना ताब्यात घेऊन, चौकशी केली जाईल, घटनेची सत्यासत्यता पडताळून न्याय मिळवून देण्यात येईल, तसेच तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.