बेळगाव लाईव्ह : जी. एस. एस. महाविद्यालयाला अलीकडेच स्वायत्तता मिळाल्यामुळे, विद्यार्थ्यांना याबाबत माहिती देण्यासाठी 28 डिसेंबर रोजी “सक्सीरियन्स 24: रि-कनेक्ट अँड रीजॉइस” हे माजी विद्यार्थ्यांचे संमेलन आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती प्राचार्य अरविंद हलगेकर यांनी आज बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, पहिल्या बॅचपासून ते सध्याच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्व आजी माजी विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या आजवरच्या सर्व आजी आणि माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणून विद्यार्थ्यांच्या समुदायाला जोडणे हा या स्नेहमेळाव्यामागचा उद्देश असल्याचे ते म्हणाले. महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा मिळणे ही अभिमानास्पद बाब असून सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे.
या आनंदात सहभागी होण्याबरोबरच जुन्या मित्र मैत्रिणींना महाविद्यालयाच्या आवारात पुन्हा भेटता यावे यासाठी महामेळाव्याचे प्रयोजन केले आहे. या महामेळाव्यात महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचपासून यंदाच्या बॅचपर्यंतचे माजी विद्यार्थी सहभागी होणार आहेत. त्यासाठी माजी विद्यार्थी संघटनेने महामेळावा समिती स्थापन केली असून त्याद्वारे सर्व नियोजन केले जात आहे. विविध माध्यमातून अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. एखाद्या महाविद्यालयाने सर्व माजी विद्यार्थ्यांना एकाचवेळी एकत्र आणण्याची ही पहिलीच वेळ असावी, असे त्यांनी सांगितले.
माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा. भरत तोपिनकट्टी म्हणाले, महामेळावा २८ डिसेंबर रोजी शनिवारी सकाळी १० ते ५ या वेळेत होणार असून भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी १० ते ११ यावेळेत नोंदणी करता येईल. सकाळी ११ ते १२ या वेळेत उद्घाटन सोहळा होणार आहे. यावेळी माजी प्राचार्य व प्राध्यापकांचा सन्मान केला जाणार आहे. दुपारी १२ ले २.३० पर्यंत माजी विद्यार्थ्यांना स्नेहमेळाव्याचं आनंद घेता येणार आहे. त्यासाठी बॅचनिहाय वर्गखोल्या उपलब्ध करुन दिल्या जाणार असून माजी विद्यार्थ्यांना जुन्या आठवणीना उजाळा देण्याची संधी मिळेल. दुपारी २.३० ते ३.३० या वेळेत स्नेहभोजनाचा कार्यक्रम होईल. तसेच समूह छायाचित्र काढले जाईल. दुपारी ३.३० नंतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
महामेळावा समितीचे प्रमुख कुलदीप हंगिरगेकर म्हणाले, सर्व माजी विद्यार्थ्यांना एकाचवेळी एकत्र येण्याची संधी मिळाली आहे. हा सोहळा अविस्मरणीय व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.. महामेळाव्याला हजारहून अधिक माजी विद्यार्थी सहभागी होणार आहेत. आतापर्यंत शेकडो जणांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली असून हा ओघ सुरुच आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रभारी प्राचार्य अभय सामंत, माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव प्रा. संदीप देशपांडे, महामेळावा समितीचे सचिव प्रा. अनिल खांडेकर, अॅड. समीना बेग यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.