बेळगाव लाईव्ह :उद्यमबाग औद्योगिक वसाहतीत गेल्या सहा महिन्यापासून रस्त्यांवरील पथदिप बंद असल्यामुळे त्रस्त झालेल्या उद्यमबाग औद्योगिक वसाहतीतील वर्कशॉप चालक व कारखानदारांची महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी काल रात्री भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच हेस्कॉम अधिकाऱ्यांशी संपर्क साधून दिवाळी असल्यामुळे पथदीप सुरू करण्याची व्यवस्था केली.
रस्त्यावरील पथदीप गेल्या सहा महिन्यापासून बंद असल्यामुळे उद्यमबाग औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांवर रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. त्यामुळे येथील उद्योजकांची मोठी गैरसोय होत असून अंधारात बुडालेला रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे.
पथदीप सुरू करण्यासंदर्भात वारंवार अर्ज विनंती करूनही दखल घेतली जात नसल्याने उद्यमबाग येथील कांही उद्योजकांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांच्याशी संपर्क साधून आपली समस्या मांडली होती. त्याची त्वरेने दखल घेत कोंडुसकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत काल बुधवारी रात्री जातीने उद्यमबाग औद्योगिक वसाहतीला भेट देऊन पाहणी दौरा केला.
यावेळी त्यांनी रस्त्यावरील अंधारामुळे त्रस्त झालेल्या तेथील उद्योजकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. फक्त समस्या जाणून न घेता त्या त्वरित सोडवण्याची आश्वासन देण्याबरोबरच रमाकांत कोंडुसकर यांनी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून दिवाळी असल्यामुळे उद्यमबाग येथील बंद असलेले पथदीप त्वरित सुरू करण्याची विनंती केली.
अधिकाऱ्यांनी देखील ती विनंती मान्य करून उद्या दिवाळी दिवशी आवश्यक दुरुस्ती करून सर्व पथदीप सुरू केले जातील असे आश्वासन दिले. या पद्धतीने पथदिपांच्या समस्येचे निवारण होणार असल्यामुळे उद्योजकांमध्ये समाधान व्यक्त केले जात होते.
उद्यमबाग औद्योगिक वसाहतीला दिलेल्या भेटी प्रसंगी बोलताना रमाकांत कोंडुसकर म्हणाले की, गेल्या सहा महिन्यापासून उद्यमबाग औद्योगिक वसाहतीतील रस्त्यावरील पथदीपबंद असल्याची येथील उद्योजकांची तक्रार आहे. त्यासाठी आज मी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली असता सर्वत्र रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पहावयास मिळाले.
आता उद्या दिवाळीचा दिव्याचा नवचैतन्याचा सण असताना या सणाच्या पूर्वसंध्येला उद्यमबागमध्ये मात्र अंधार पसरलेला आहे. या संदर्भात मी हेस्कॉमच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी उद्या सकाळी 11 वाजता उद्यमबाग येथील बंद असलेले पथदीप सुरू करण्यात येतील असे आश्वासन दिले आहे.
बंद पथदिपा संदर्भात ज्या कारखानदारांनी मला फोन केला होता, त्यांची आज मी भेट घेतली. तसेच त्यांच्याकडून या भागातील समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या समस्या ऐकताना बेळगाव शहराला कोणी वाली नाही का? असे वाटून गेले. साध्या मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याऐवजी सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सध्या सुरू आहे.
आता उद्या दिवाळी असल्यामुळे उद्यामबाग येथील वर्कशॉप, कारखान्यांमध्ये पूजाअर्चा सुरू होणार आहे. तेंव्हा तत्पूर्वी या ठिकाणचे सर्व पथदीप सुरू करण्यात यावेत, असे मी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले असून त्यांनी ते उद्या तात्काळ सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे, असे कोंडुसकर यांनी सांगितले.