(टिळकवाडीचे निवासी आणि सिद्धार्थ इंडस्ट्रीज चे संस्थापक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री सुहासचंद्र चंदगडकर यांचे गेल्या 13 ऑक्टोबर रोजी देहावसान झाले आज त्यांचा बारावा दिवस. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा)
बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराचा इतिहास पाहिला असता या शहरात जे जे उद्योजक होऊन गेले त्यापैकी बरेच जण हे स्वतःच्या कर्तुत्वाने आणि मेहनतीने पुढे आलेले होते असे दिसून येते. अशांमध्ये एका उद्योजकांचे नाव ठळकपणे घ्यावे लागते ते म्हणजे सुहासचंद्र चंदगडकर यांचे.
सुहासचंद्र चंदगडकर यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे वडील पांडुरंग चंदगडकर हे रजपूत बंधू हायस्कूलचे आदर्श शिक्षक आणि संस्थापक होते. जे उपलब्ध आहे त्यातून जास्तीत जास्त आणि सर्वोत्तम कसे बनवायचे हे त्यांना परिस्थितीने शिकवले. अनेक भावंडांसोबत एका छोट्या घरात राहिल्याने त्यांना एकमेकांची काळजी कशी घ्यायची याचे भान होते. ते हेही शिकले की विकास व्हायचा असेल तर आपल्या लोकांनाही सोबत घेऊन जावे लागते.
सुहासचंद्र हे पांडुरंगराव यांचे ज्येष्ठ चिरंजीव. लहानपणापासूनच एक अतिशय हुशार विद्यार्थी होते. त्यांनी आपल्या ज्ञानाचा चतुराईने उपयोग केला. ते नेहमी म्हणायचे की तुम्ही जे वाचत किंवा शिकत आहात ते तुम्ही नेहमी समजून घेतले पाहिजे, त्याना जे शिकायला मिळाले ते इतरांना शिकवायला त्यांना आवडायचे .कारण ते म्हणायचे की ही शिकवण स्वतःचा समज मजबूत करेल. शाळेत ते नेहमी प्रथम यायचे. सुहासचंद्र हे बेननस्मिथ हायस्कूलमधून दहावी झाले. त्यानंतर गुणवत्तेवर त्याना सरकारी पॉलिटेक्निक बेळगावमध्ये प्रवेश मिळाला. मेकॅनिकल इंजिनीअरिंग हा त्यांचा प्रमुख विषय होता. त्या विषयात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आणि नेहमीच प्रथम स्थान मिळविले. अभ्यासाबरोबरच नाटक, खेळ इत्यादी अनेक उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. ते महाविद्यालयात बुद्धिबळ चॅम्पियनही होते.ते एक साहसी व्यक्ती होते ज्यांना अत्यंत धैर्याची चाचणी घेणे आवडे. ते म्हणत की ,अंगात कौशल्य असण्याबरोबरच संधी चे सोने करण्याची, काहीतरी नवीन घडवण्याची हिंमत असली पाहिजे.
डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात गोव्यातील चौगुले माईन्स येथून केली. तिथे काही काळ राहिल्यानंतर त्यांना पूसाळकर यांच्या बेम्को या उद्योग समूहात डिझाईन विभागात संधी मिळाली. तेथे नोकरीच्या मुलाखती दरम्यान, त्याच्या आवडीचा विषय निवडण्यास सांगितले गेले, त्या विषयाचे पुस्तक देण्यात आले आणि ते वाचण्यास सांगुन नंतर प्रश्न विचारण्यात आले. त्यांनी दिलेली उत्तरे पाहून मुलाखतकार अचंबित झाले. त्यानी आपल्या सर्व वरिष्ठांनाही मागे टाकले.
त्यांच्या कामातील कौशल्यामुळे त्यांना या विभागाच्या प्रमुखपदी बढती मिळाली.
त्यांनी आपल्या कार्यकाळात या विभागात अनेक सुधारणा घडवून आणल्या, ज्यामुळे डिझाइनची प्रक्रिया अचूक आणि आटोपशीर झाली. पुढे त्यांना वर्क्स मॅनेजर या सर्वोच्च पदावर बढती मिळाली.
या कार्यकाळात, त्यांना अनेक नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळाली आणि त्यांनी त्यांचा उपयोग उत्पादन वाढीसाठी आणि नवनवीन उत्पादने विकसित करण्यासाठी केला. जर्मनी व इतर अनेक राष्ट्राकडून सहकार्य मिळविण्याची जबाबदारीही त्याच्यावर होती. ती त्यांनी समर्थपणे पेलली.
सुहासचंद्र हे एक उत्तम वाचक होते. आपल्यासमोर जे आहे ते वाचून त्यांनी ज्ञान मिळविले.ते म्हणत की तुम्ही जे काही वाचता, त्याचा कधीतरी उपयोग होईल. त्यांची स्मरणशक्ती तल्लख होती आणि ते एकपाठी होते. एकदा वाचनात आलेल्या सर्व गोष्टी त्यांना आठवणीत राहायच्या.
बेम्को मधील 14 वर्षांच्या प्रदीर्घ कार्यकाळानंतर, त्यांना स्वतः वेगळे काहीतरी करावे असे प्रकर्षाने वाटू लागले .पण आपण ज्यांच्याकडे काम करतो त्यांचीही अडचण होऊ नये म्हणून बेम्कोच्या व्यवस्थापनाला आश्वासन देऊन राजीनामा दिला की, जोपर्यंत त्यांना योग्य उत्तराधिकारी मिळत नाही तोपर्यंत काम चालू ठेवतो. ते पुढे 3 वर्षे राहिले, त्यांच्या उत्तराधिकार्यांने योग्य असे प्रशिक्षण घेतल्यानंतर व्यवस्थापनाने त्यांना मोकळे होण्याची अनुमती दिली.
त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या मनात अनेक प्रकल्प घोळत होते, परंतु नेमकी सुरुवात कुठून करायची हे फायनल होत नव्हते . त्यांच्या महान कार्य क्षमतेवर खूप विश्वास असलेले अनेक परिचित होते. त्यांच्यापैकी एकाला एक्सट्रूजन प्रेस बनवून पाहिजे होता त्यांनी सुहासचंद्रना संपर्क करून डिझाईन बनवायला सांगितले. तेव्हा ते बनवण्यासाठी आपल्याकडे कोणतीही साधन सामुग्री नसल्याचे सुहासचंद्रनी स्पष्ट केले. तेव्हा तुम्ही फक्त डिझाईन बनवा बाकीचे नंतर बघूया असे त्या व्यक्तीने सांगितले. डिझाईन बनवल्यानंतर, सुहासचंद्र यांना कच्च्या मालाचा स्रोत आणि ते तयार करण्यासाठी सुविधा शोधण्यास सांगितले.
हे सर्व उपलब्ध झाल्यावर सुहासचंद्र यांनीच मशीन बनवावे असा आग्रह धरला आणि त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. हे काम हाती घेतलेल्या चंदगडकर यांनी ही आपल्याला मिळालेली संधी आहे तिचे सोने करायची असा निर्णय घेतला आणि ते झपाट्याने कामाला लागले. त्यातूनच भारतातील पहिले तांत्रिकदृष्ट्या डिझाइन केलेले एक्सट्रुजन प्रेस बनवून ते यशस्वीरित्या पूर्ण झाले.
त्यांनी डीप ड्रॉइंग, रबर मोल्डिंग आणि अनेक स्पेशल पर्पज मशीन्सचा विकास आणि निर्मिती केली. त्यांच्यातील ही कल्पकता पाहून त्यांना अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी कामे दिली. त्यांनी बजाज ऑटो, टीव्हीएस ग्रुप आदींच्या अनेक मशीन्स विकसित केल्या. या प्रत्येक कामात त्यांना नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्याचे आव्हान पेलता आले.
काहींनी क्लिष्ट अभियांत्रिकी, काहीनी नवीन उत्पादने, तर काहीनी नवीन डिझाइनची मागणी केली. त्यानी हे सर्व स्वतः लक्ष घालून केले आणि नेहमीच सर्वोत्तम रिझल्ट मिळाला . सुरुवातीला त्यांच्यासोबत कामावर असलेले सर्व लोक नवीन आणि अनुनभवी होते. सुहासचंद्र यांनी त्यांना वैयक्तिकरित्या मार्गदर्शन करून ड्रॉइंग, वायरिंग इत्यादी बरोबरच त्यांच्यातील कौशल्य विकसित केले. त्यांनी शेवटपर्यंत नवीन घडामोडींवर वैयक्तिकरित्या देखरेख केली.
बजाज ऑटो एका डीप ड्रॉईंग प्रेसच्या शोधात होते. जे डीप ड्रॉईंग मशीनवर बनवताना अनेक अडचणी येत होत्या व त्यामुळे बरेच नुकसान होत होते. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर सुहासचंद्र यांनी त्यांची समस्या दूर करण्यासाठी पूर्णपणे वेगळी रचना मांडली. तपशील निश्चित करण्यात आला आणि बजाज ऑटोने बेळगाव येथे यशस्वी चाचणीनंतरच मशीन स्वीकारले जाईल अशी अट घातली. मशीन बनवली गेली आणि बेळगाव येथे अनेक चाचण्या घेण्यात आल्या, तेव्हा एकही पीस नाकारला गेला नाही. सुहासचंद्र यांनी दिलेल्या पर्यायामुळे बजाज ऑटो खूप खूश झाले आणि त्यानंतर चंदगडकर यांच्याशी त्यांचा दीर्घकाळ व्यावसायिक संबंध राहिला. सुहासचंद्र यांनी अशा अनेक कंपन्यांसाठी असे अनेक उपाय सुचविले. प्रत्येक मशीन म्हणजे एक आव्हानच होते.
सुहासचंद्र यांच्या कार्यतत्परतेचचे दुसरे उदाहरण म्हणजे विक्रम साराभाई स्पेस सेंटरला दिलेला पर्याय. त्याना इन्सुलेटर चाचणी मशीनची आवश्यकता होती हे आव्हान स्वीकारून सुहासचंद्र यांनी त्याना दिलेल्या सोल्यूशनमुळे व्हीएसएससी सिंगल पार्टी टेंडर म्हणून सहमती दर्शवली.
या क्षेत्रात काम करीत असताना एक्सट्रुजनसाठी मोठी बाजारपेठ असल्याचे पाहून त्यानी आपले लक्ष त्या क्षेत्रावर केंद्रित केले. त्यानी एक्सट्रुजन प्रेस विकसित केले जे युरोपियनांपेक्शा चांगले नसले तरी त्यांच्या एवढेच चांगले होते.
टूलिंग टू प्रॉडक्ट, पार्ट टू पार्सल विकसित केल्याबद्दल, ते भारतातील एक्सट्रूजन उद्योगाचे जनक ठरले आहेत. त्याचे काम इतके अप्रतिम होते की जर्मन लोकांनी सहकार्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला, ज्याला त्यानी स्पष्टपणे नकार दिला. त्याना स्वत:च्या ब्रँडची भारतीय मशीन हवी होती, जी त्यानी यशस्वीपणे पूर्ण केली. त्यांचे बरेच काम पेटंट करण्यायोग्य होते, परंतु जागरूकता आणि सुविधांच्या अभावामुळे ते होऊ शकले नाही. त्यांनी अनेक उपकरणे विकसित केली ज्यामुळे उत्पादकता सुधारली आणि उत्पादन दर चांगले झाले.
पुरवठा केलेल्या उत्पादनांच्या सुधारणेसाठीही त्यांनी योगदान दिले. त्याबाबतचे एकच उदाहरण द्यावेसे वाटते ते म्हणजे त्यांनी रेक्स्रोथ या जगप्रसिद्ध कंपनीशी सम्पर्क साधला आणि सुचविले की त्यांचे उत्पादन त्यांच्या पंपाचे कार्य करण्यासाठी खूप अचूक आहे. कंपनीने एकतर उत्पादन अचूक करावे किंवा वेगळे लुब्रिकेशन प्रदान करावे. ही सूचना कंपनीकडून स्वीकारण्यात आली आणि त्यांच्या डिझाइनला -S चा प्रत्यय देण्यात आला.
युरोप, अमेरिका, मिडल इस्ट आणि जगाच्या अनेक भागांमध्ये उत्पादने निर्यात करून त्यांनी त्यांच्या कार्याला एक भक्कम आधार दिला. सुहासचंद्र यांच्या नेतृत्वाखाली 350 टन वजनाचे सर्वात मोठे मशीन 2.5 मेगावॅटच्या कनेक्टेड लोडसह तयार केले गेले. हे देशात आतापर्यंतचे बनविलेले अशा प्रकारचे सर्वात मोठे मशीन आहे.
1983 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या हस्ते त्यांना औद्योगिक उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ते एक उत्साही ब्रिज खेळाडू होते आणि त्यानीं अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन पुरस्कार मिळवले आहेत . टिळकवाडी क्लब, बेळगावच्या ब्रिज असोसिएशनचे ते अध्यक्ष होते आणि जेव्हा त्यांनी या असोसिएशनचा कार्यभार हाती घेतला तेव्हा त्यांनी अनेक स्पर्धा आयोजित केल्या ज्यातून असोसिएशनला बराच निधी मिळाला. त्यांनी नवीन खेळाडूंना हा खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहनही दिले आणि त्यांना सोप्या पद्धतीने शिकवण्याचे स्वतःचे तंत्र विकसित केले.
सुहासचंद्र होते म्हणूनच त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होऊन बाहेर पडलेले अनेक उद्योजक यशस्वी आहेत.
मराठा मंडळ या शैक्षणिक संस्थेचे ते संचालक होते आणि त्या संस्थेच्या विकासासाठी सुहासचंद्र यांनी भरीव योगदान दिले आहे. या संस्थेच्या अनेक विभागात सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता कारणीभूत ठरली. मराठा मंडळाच्या दंत आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या बांधकाम आणि विकासामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता.
ते BIS मानकांसह अनेक तांत्रिक संस्थांच्या समितीवर होते आणि त्या मानकांच्या निर्मितीमध्ये त्यांचे मोठे योगदान होते.
एक व्यक्ती म्हणून, ते एक उत्तम माणूस होते. तांत्रिक किंवा अन्य प्रत्येक समस्येवर निर्विवादपणे योग्य उपाय शोधू शकणारे दृष्टापुरुष होते. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचा नेहमी प्रत्यय आणून देणारे सुहासचंद्र हे शांत,नम्र, प्रामाणिक आणि स्पष्ट वक्ते होते. त्यांनी उत्कृष्ट गोष्टींकडे लक्ष दिले, ज्ञान, शिक्षण, स्वावलंबनाच्या गरजेवर भर दिला आणि समाजासाठी मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण केल्या.
सुहासचंद्र यांच्या पश्चात पत्नी डॉ. स्वाती, मुलगा सिध्दार्थ, सून अपूर्वा, कन्या पद्मजा, जावई संकेत कामत, नातवंडे अथर्व, जुई व विहान हे आहेत. लहान असल्यापासूनच त्यांचे चिरंजीव सिध्दार्थ इंडस्ट्रीकडे जातात. त्यांचे शिक्षण जी.आय.टी. मधून बी.ई. (मेक) झाले असून, यु.एस. मध्ये त्यांनी कंट्रोल्स व डायनॅमिक्स स्पेशलायझेशनसह एम.एस. केले आहे. 2001 पासून ते पूर्ण वेळ सिध्दार्थ हेवी इंडस्ट्रीज प्रा. ली. चा कारभार पहात आहेत.
सुहासचंद्र आज आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांनी निर्माण केलेले हे उद्योग विश्व नेहमीच त्यांची आठवण देत राहील. त्यांच्या स्मृतीस आमचे विनम्र अभिवादन!