बेळगाव लाईव्ह:विमानतळ बॉम्बस्फोटाने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मिळाल्यामुळे बेळगाव विमानतळावर एकच धावपळ उडवून युद्धपातळीवर तपास कार्य हाती घेण्यात आल्याची घटना आज रविवारी सकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार बेळगावच्या सांबरा विमानतळाचे संचालक त्यागराज यांना आज रविवारी सकाळी अज्ञात ई-मेलद्वारे तुमच्या विमानतळावर बॉम्ब ठेवण्यात आला असून त्याचा स्फोट करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले.
परिणामी सतर्क झालेल्या बेळगाव विमानतळाच्या सुरक्षा यंत्रणेकडून सुरक्षा व्यवस्था कडक करण्याबरोबरच प्रवासी वगैरे सर्वांना बाहेर काढून विमानतळ रिकामी करण्यात आले. त्यानंतर बॉम्ब स्क्वाड अर्थात बॉम्ब शोध पथकाकडून युद्धपातळीवर संपूर्ण विमानतळाची आतील व बाहेरील बाजूने तपासणी करण्यात आली.
यावेळी स्फोटक शोधणाऱ्या श्वान पथकाचा अवलंब करण्यात आला होता. या पद्धतीने अचानक धावपळ उडवून घाई गडबडीने सुरक्षा पथकाने हाती घेतले तपास कार्य विमानतळावरील प्रवासी आणि त्यांच्या नातलगांमध्ये चर्चेचा विषय झाले होते. सुरक्षा यंत्रणेने विमानतळाच्या कानाकोपऱ्याची कसून तपासणी करून देखील आक्षेपार्ह काहीच आढळले नसल्याने विमानतळ प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला.
बॉम्ब स्फोटाच्या धमकीचा ई-मेल चेन्नई येथून अज्ञातांनी धाडला असून याप्रकरणी विमानतळाचे संचालक त्यागराज यांनी मारीहाळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी ई-मेल पाठवणाऱ्याचा छडा लावण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे.
पोलिसांना ई-मेल पाठवणाऱ्यांचा चेन्नई तामिळनाडू येथील आयपी ऍड्रेस मिळाल्याचे कळते. त्यामुळे आता तपास पूर्ण झाल्यानंतरच ई-मेल कोणी? आणि कोणत्या उद्देशाने? पाठवला हे स्पष्ट होणार आहे.