बेळगाव लाईव्ह:बेळगाव तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी 4 ते 7 या कालमर्यादेमध्ये परिवहन बससेवा पूर्णपणे कोलमडत असल्यामुळे सदर कालावधीत बसेसची संख्या वाढवावी, अशी मागणी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने वायव्य कर्नाटक राज्य परिवहन मंडळाचे बेळगाव विभागीय नियंत्रकांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या शिष्टमंडळाने उपरोक्त मागणीचे निवेदन परिवहन मंडळाचे विभागीय नियंत्रक राजेश यांना सादर केले. निवेदनाचा स्वीकार करून अधिकारी राजेश यांनी लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
आपल्या मागणी संदर्भात बोलताना माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले की बेळगाव तालुक्यातील विविध गावांसाठी असलेली परिवहन मंडळाची बससेवा अलीकडच्या काळात सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी 4 ते 7 वाजण्याच्या कालावधीमध्ये पूर्णपणे कोलमडत आहे. सर्वसामान्यपणे सकाळी कामाला अथवा शाळेला जाण्याच्या वेळेत आणि सायंकाळी घरी परतण्याच्या वेळेत बसेसना गर्दी होत असते.
मात्र यंदा यामध्ये महिलांच्या मोफत बस प्रवासाची भर पडली आहे. परिणामी सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत तालुक्याच्या ग्रामीण भागात ये-जा करणाऱ्या बसेसना प्रचंड गर्दी होत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय परवड होण्याबरोबरच तुडुंब भरलेल्या बसेसमुळे अपघाताच्या घटनाही घडत आहेत. खरे तर महिलांसाठी बस प्रवास मोफत केल्यास बसेसना गर्दी होणार आहे हे लक्षात घेऊन सरकारने प्रत्येक बस आगाराच्या बसेसची संख्या वाढवावयास हवी होती.
मात्र दुर्दैवाने तसे घडलेले नाही. त्यामुळे सध्या होत असलेल्या प्रवाशांच्या गर्दीच्या तुलनेत बसेसची संख्या अपुरी पडत आहे. त्यासाठी सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी 4 ते 7 वाजण्याच्या कालावधीमध्ये बसेसची संख्या वाढवावी अशी मागणी आम्ही केली आहे. परिवहन अधिकाऱ्यांकडून 60 अतिरिक्त बसेस आल्या असून आणखी 30 बसेस येणार आहेत असे सांगितले जात आहे. त्यासाठी दोन महिने थांबावे लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
मात्र इतके दिवस वाट पाहण्याची आमची तयारी नाही जर येत्या 15 दिवसात बेळगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील बसेसची संख्या वाढवण्यात आली नाही तर उग्र आंदोलन हाती घेऊन परिवहन कार्यालयाला घेराव घातला जाईल असा इशारा आम्ही परिवहन अधिकाऱ्यांना दिला आहे.
विद्यमान लोकप्रतिनिधी बेळगाव ग्रामीण मतदार संघाचे नंदनवन झाले आहे असे सांगत आहेत. तथापी ते नंदनवन आहे की नरक? हे त्यांनी प्रत्यक्ष पहावे असे सांगून लवकरात लवकर तालुक्यातील ग्रामीण भागासाठी बसेसची संख्या वाढवावी एवढीच आमची मागणी आहे, असे माजी आमदार मनोहर किणेकर शेवटी म्हणाले.
याप्रसंगी माजी आमदार बेळगाव तालुका समितीचे चिटणीस एम जी पाटील , आर के पाटील, मनोहर संताजी, आर एम चौगुले, रामचंद्र मोदगेकर, लक्ष्मण होणगेकर,विठ्ठल पाटील, मोनाप्पा पाटील, मल्लाप्पा गुरव सुधीर चव्हाण, आनंद पाटील, संतोष मंडलिक, बाबाजी देसुरकर, मारुती पाटील, यल्लाप्पा घंटांनी, बाळासाहेब भगरे,नारायण दळवी, मनोर हुंदरे, पियुश हावळ,डी बी पाटील, राजू किणयेकर, अरुण जाधव, विनायक पाटील, दीपक पाटील, आदी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
रस्त्यांच्या दुर्दशेसंदर्भात म. ए. समितीचा आंदोलनाचा इशारा
रायचूर ते बाची हा राज्य महामार्ग असल्यामुळे बेळगाव ते बाचीपर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याबरोबरच बेळगाव तालुक्यातील विविध गावांना जोडणाऱ्या खराब रस्त्यांची येत्या 15 दिवसात प्राधान्याने एक तर दुरुस्ती केली जावी किंवा त्यांचे नूतनीकरण केले जावे अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला आहे.
बेळगाव तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज शुक्रवारी सकाळी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. यावर्षी मुसळधार पावसामुळे बेळगाव तालुक्यातील जवळपास सर्व रस्त्यांचे संपूर्णपणे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने रायचूर ते बाची अर्थात बेळगाव ते सावंतवाडी पर्यंतचा वेंगुर्ला रोड या रस्त्याची संपूर्ण दुर्दशा झाली आहे. आसपासच्या गावांना जोडणाऱ्या सदर रस्त्यावर कायम अवजड वाहतूक असते. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात हा रस्ता अतिशय खराब झाला असून त्यामुळे जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या रस्त्याच्या दुरुस्ती व बांधकामासाठी सरकारने निधी मंजूर केला आहे. तेंव्हा रायचूर ते बाचीपर्यंतचा हा रस्ता राज्य महामार्ग असल्यामुळे बेळगावपासून बाचीपर्यंत म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या सीमेपर्यंतच्या या रस्त्याचे चौपदरीकरण केले जावे. त्याचप्रमाणे बेळगाव तालुक्यातील बडस ते बाकनुर रस्ता, मच्छे ते वाघवडे रस्ता, कंग्राळी ते कडोली रस्ता, पिरनवाडी ते किणये रस्ता, उचगाव ते बेक्किनकेरी रस्ता, हायवे ते शिंदोळी रस्ता वगैरे सर्व रस्ते खराब झाले आहेत. तरी याची गांभीर्याने दखल घेऊन येत्या 15 दिवसात प्राधान्याने या रस्त्यांची डागडुजी केली जावी अन्यथा बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विरोधात आंदोलन छेडले जाईल, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.