बेळगाव लाईव्ह : महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात शुक्रवारी सकाळी जयतीर्थ सवदत्ती यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम स्थायी समितीची बैठक झाली. अडीच महिन्यानंतर झालेल्या या बैठकीत अनेक विषयांवरून अधिकार्यांना धारेवर धरण्यात आले. या बैठकीस जयतीर्थ सवदत्ती.
शेजारी उपमहापौर आनंद चव्हाण, गिरीश धोंगडी, उदयकुमार उपरी, संतोष पेडणेकर, रविराज सांबरेकर, शिवाजी मंडोळकर, उदयकुमार तरवाळ, अॅड. उमेश महांतशेट्टी, लक्ष्मी निपाणीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
महापालिकेकडे दोन सकिंग मशिन्स आहेत. तर शहरात बेकायदेशीरपणे सात सकिंग मशिन वाहने फिरत आहेत. त्यांच्याकडून चार ते पाच हजार रुपये आकारण्यात येत आहेत. हे वाहनधारक बेकायदेशीरपणे महापालिकेच्या ड्रेनेज लाईनमध्ये आणि नाल्यांमध्ये ड्रेनेज सोडत आहेत. महापालिकेच्याच काही लोकांकडून खासगी वाहनधारकांना संपर्क साधून देण्यात येतोय.
त्यामुळे महापालिकेला आर्थिक फटका बसत असून बेकायदेशीर वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. त्यांचे परवाने तपासून पोलिस तक्रार करण्यात यावी. सर्वांची बैठक घेवून सूचना कराव्यात, अशा सूचना करण्यात आल्या. महापालिकेच्या सकिंग मशिनचा गैरवापर, खासगी सकिंग मशिन वाहनचालकांची बेकायदा वर्दळ आणि शहरात बंद असलेल्या पथदीपांवरून बांधकाम स्थायी समिती बैठकित अधिकार्यांना धारेवर धरण्यात आले. तर यापुढे सकिंग मशिनच्या वापरासाठी अडीच हजार रुपये आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी महापालिकेच्या सकिंग मशिनकडून आतापर्यंत दोन हजार रुपये आकारण्यात येत होते. ते आता अडीच हजार रुपये आकारण्यात यावेत, असा ठराव संमत करण्यात आला.
या बैठकीत पथदीपांवरूनही अधिकार्यांना चांगलेत खडसावण्यात आले. पथदीप दुरुस्ती करण्यासाठी आठ वाहने असूनसुद्धा अनेक ठिकाणी पथदीप बंद आहेत. स्मशानांतही पथदीप सुरू नाहीत. त्यामुळे लोकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. लोक आम्हाला जाब विचारत आहेत. यापुढे असा प्रकार घडला तर आम्हालाच कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशारा सत्ताधारी गटनेते गिरीश धोंगडी यांनी दिला.
शहापूर स्मशानभूमीच्या दूरवस्थेचा विषय उपमहापौर आनंद चव्हाण यांनी उपस्थित केला. त्याठिकाणी स्वच्छता नाही. पत्र्यांची दूरवस्था झाली आहे. लाईट नाही, त्यामुळे लोकांना त्रास होत आहे, असे सांगितले. त्यावर अधीक्षक अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांनी 31 लाखातून स्मशान सुधारणेचे काम हाती घेण्यात येणार आहे, असे सांगितले. यावेळी सर्व स्मशानभूमीत विद्युत दिवे सुरू असावेत. स्वच्छता असावी, यासाठी पाहणी करून दर महिन्याला अहवाल द्यावा, अशा सूचना करण्यात आल्या.
यावेळी जेसीबी चार महिन्यांपासून बंद असल्यामुळे नाला स्वच्छतेचे काम होत नाही, असा आरोप संतोष पेडणेकर यांनी केला. त्यावर वर्क ऑर्डरवर आयुक्त अशोक दुडगुंटी यांची सही झाली नसल्यामुळे काम थांबले आहे. याची माहिती आपण महापौर, उपमहापौर आणि आरोग्य स्थायी समिती अध्यक्षांना दिली आहे, असे कौन्सील सेक्रेटरी उदयकुमार तळवार यांनी सांगितले. बैठकीत मोरी बांधकाम, बस थांबा उभारणी, पथदीप उभारणी आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत विरोधी गटनेते मुजम्मील डोणी यांनी लक्ष्मी मार्केट येथे अतिक्रमण होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. लक्ष्मी मार्केट व्यापारी संकुलात गांजा, मटका अशी बेकायदा कृत्ये होत आहेत. त्यामुळे याठिकाणी व्यापारी संकुल उभारण्यात यावे, अशी मागणी केली. या मागणीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना अधीक्षक अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांना देण्यात आला.
विरोधी गटनेते मुजम्मील डोणी, रविराज सांबरेकर, शिवाजी मंडोळकर, बसवराज मोदगेकर, अभिजीत जवळकर, कायदा सल्लागार अॅड. उमेेश महांतशेट्टी, नगर रचना अधिकारी वाहिद अख्तर, इलेक्ट्रिक अभियंता आनंद देशपांडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.