बेळगाव लाईव्ह :बेळगाव दक्षिण उपनोंदणी कार्यालय स्थलांतराच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्यात आली असून सदर कार्यालय आज गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालय आवारात स्थलांतरित करण्यात आले आहे.
संपूर्ण बेळगाव शहरासाठी पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात (डीसी कंपाउंड) एकच उपनोंदणी कार्यालय होते. मात्र जनतेच्या सोयीकरिता दक्षिण मतदार संघासाठी 20 जुलै 2020 रोजी उद्यमबाग येथील सुभाषचंद्रनगर येथे दक्षिण उपनोंदणी कार्यालय सुरू करण्यात आले. तथापी बीएसएनएलच्या खाजगी इमारतीत सुरू केलेले हे कार्यालय कालांतराने सोयी ऐवजी गैरसोयीचे ठरू लागले होते. मुळ शहरापासून 7 कि.मी. अंतरावर हे कार्यालय असल्याने मालमत्तांची खरेदी आणि विक्री करण्यासाठी जाणार्या लोकांची हेळसांड होत होती
. त्याचबरोबर या कार्यालयात 2003 नंतरचे दाखले उपलब्ध नसल्यामुळे 72 गावच्या लोकांना जिल्हाधिकारी कार्यालयात आवारात असलेल्या उत्तर उपनोंदणी कार्यालयात जावे लागायचे. याखेरीज दक्षिण उपनोंदणी कार्यालयासाठी प्रतिमहा 79,414 रुपये याप्रमाणे वर्षाकाठी 9 लाख 52 हजार 968 रुपये भाडे द्यावे लागत असल्याने सरकारचे आर्थिक नुकसान होत होते.
त्यामुळे हे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय आवारात किंवा उत्तर उपनोंदणी कार्यालयात स्थलांतरित करण्यात यावे, असा आदेश सरकारने 9 जुलै 2024 रोजी जारी केला होता. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची सूचना पालकमंत्री सतीश जारकीहोळी यानी जिल्हा प्रशासनाला केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सदर कार्यालय स्थलांतरित करण्याचा आदेश जारी करताच त्याची जलद गतीने अंमलबजावणी करण्यात आली आहे.
बेळगाव दक्षिण उपनोंदणी कार्यालयामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आसन व्यवस्था, संगणक, वीज जोडणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
त्याचप्रमाणे कार्यालयाची रंगरंगोटी करण्याबरोबरच कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी स्वच्छतागृह, पिण्याची पाण्याची व्यवस्था व इतर सुविधांची सोय करण्यात आली आहे. दरम्यान, उपनोंदणी कार्यालयासाठी उपलब्ध जागा पूरक असून कागदपत्रांच्या दृष्टीने हे कार्यालय नागरिकांसाठी अधिक सोयीचे ठरणार असल्याचे मत दक्षिण उपनोंदणी कार्यालय अधिकारी एम. बी. धुमाळे यांनी व्यक्त केले आहे.