बेळगाव लाईव्ह : सध्या कर्नाटकाच्या राजकारणाचे वारे उलटसुलट पद्धतीने वाहू लागले आहेत. भविष्यात कर्नाटकातील सरकार कोणत्या दिशेने जाईल आणि या सरकारचे भवितव्य काय असेल याचा अंदाज कुणालाच बांधता येणे शक्य नाही.
अनेक राजकीय जाणकार तर्कवितर्क लढवून प्रतिक्रिया देत आहेत. मात्र राजकारण्यांकडून या चर्चांना हूल देत आपल्याचपद्धतीने राजकारण सुरु असल्याचे दिसून येत आहे. या राजकीय वातावरणाचा प्रत्यय काल रविवारी श्री क्षेत्र सौंदत्ती यल्लम्मा देवस्थानात झालेल्या व्यासपीठावरील कार्यक्रमात दिसून आला.
सौंदत्ती येथे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री उपस्थितांना संबोधित करण्यासाठी खुर्चीवरून उठले आणि मुख्यमंत्र्यांची खुर्ची रिकामी झाली.
दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या डाव्या बाजूला मंत्री सतीश जारकीहोळी आणि उजव्या बाजूला डी. के. शिवकुमार स्थानापन्न झाले होते. मात्र खुर्चीवरून मुख्यमंत्री उठताच खुर्ची रिकामी झाली आणि प्रसारमाध्यमांनी नेमकी हीच बाब हेरून डीकेशी आणि जारकीहोळी यांच्याकडे लक्ष केंद्रित केले.
हि बाब दोन्ही मंत्र्यांच्या लक्षात येताच डीकेशींनी आपल्या जागेवरून उठून थेट सतीश जारकीहोळी यांच्या शेजारी जाऊन कुजबुज सुरु केली. हि बाब देखील प्रसारमाध्यमांच्या निदर्शनात आली. आणि याचवेळी मुख्यमंत्र्यांच्या रिकाम्या झालेल्या खुर्चीवर डीकेशींनी जागा मिळवल्याच्या गोष्टीवरून आणखीनच चर्चांना ऊत आला. दोन्ही मंत्र्यांनी देखील काँग्रेस सरकार आणि मुख्यमंत्र्यांच्या सरकार चालविण्याच्या कुशलतेवरून भरभरून कौतुक केले खरे.
मात्र मुख्यमंत्र्यांच्या रिकाम्या खुर्चीवरून घडलेल्या घडामोडी या केवळ प्रासंगिक होत्या कि अंतर्गत राजकारण देखील अशाच पद्धतीने सुरु आहे? हे प्रश्न मात्र पुन्हा उपस्थित होऊ लागले.
यावेळी मुख्यमंत्री सिध्दरामय्यांनी मात्र उपस्थित जनतेचे आभार मानले. आपण जर माझ्यासोबत अशाचपद्धतीने खंबीरपणे उभे राहिलात तर आपल्याला आपल्या जागेवरून कुणीच हटवू शकणार नाही असे सूतोवाचही केले. त्यामुळे मुख्यमंत्री आपली खुर्ची सोडणार नाहीत, आणि इच्छुकांच्या चर्चा या केवळ चर्चेपुरत्याच मर्यादित राहतील, यावर जणू मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तबच केल्याचे जाणवले…