Saturday, November 23, 2024

/

ज्येष्ठ धावपटू एस. एल. देवरमणी यांचे राष्ट्रीय स्पर्धेत यश

 belgaum

बेळगाव लाईव्ह:बेळगावचे ज्येष्ठ धावपटू व भारतीय संरक्षण सेवेतील निवृत्त कर्मचारी 72 वर्षीय एस. एल. देवरमणी यांनी व्हेटरन्स स्पोर्ट्स अँड गेम्स नॅशनल फाउंडेशनशी संलग्न व्हेटरन्स स्पोर्ट्स अँड गेम्स असोसिएशन नाशिकद्वारे नुकत्याच आयोजित प्रतिष्ठेच्या ‘3 ऱ्या राष्ट्रीय व्हेटरन्स स्पोर्ट्स चॅम्पियनशिप -2024’ मध्ये कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करत 3 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे.

नाशिक, महाराष्ट्र येथील कै. मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे गेल्या 23 ते 27 ऑक्टोबर 2024 या कालावधीत उपरोक्त राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत भारतातील सर्व राज्य खेळाडू श्रीलंका देशातील खेळाडूंसह विविध खेळांमध्ये सहभागी झाले होते.

त्यामध्ये बेळगावच्या ॲथलेटिक्स क्षेत्रातील एक उल्लेखनीय व्यक्तिमत्व असलेल्या एस. एल. देवरमणी यांनी पुरुषांच्या 10 आणि 5 कि.मी. धावणे शर्यतीत सुवर्ण पदक, तसेच 5 कि.मी. चालण्याच्या शर्यतीत सुवर्ण पदक, 800 मी. धावणे शर्यतीत रौप्य, 4×400 मी. रिले शर्यतीत रौप्य आणि 1500 मी. धावण्याच्या शर्यतीत कांस्य पदक पटकावले.

आपल्या शानदार कारकिर्दीत देवरमणी यांनी कॉलेजच्या दिवसांपासून आजपर्यंत 400 हून अधिक पदकांचा प्रभावी संग्रह जमा केला आहे. चन्नम्मानगर येथे छोटे किराणा स्टोअर चालवणारे सेवानिवृत्त देवरमणी सरांनी उपरोक्त यशानंतर बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड कॅम्प बेळगावचे सीईओ राजीव कुमार यांनी पाठिंबा आणि प्रेरणा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

तसेच रेल्वेचे तिकीट मिळवून देऊन नाशिकला वेळेत पोहोचण्यास सहकार्य करणारे रेल्वे पोलिस (जीआरपी) व्यंकटेश यांच्यासह स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवश्यक निधीची व्यवस्था करण्यात मदत करणारे फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे संतोष दरेकर, अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हुली, विजय भद्रा, सौरभ सावंत, नितीन लोकूर, ओम अनावेकर, सोहम अणवेकर, शैलेश भातकांडे, सुनील धोंगडी, उदय किंजवडेकर, किरण निप्पाणीकर, मंदार कोल्हापुरे,वचंद्रकांत चव्हाण, केएलएस पब्लिक स्कूल बेळगावचे व्यवस्थापकीय अधिकारी शालिनी संक्रोनी, प्राचार्य येवळे, एक्सपर्ट व्हॉल्व्ह्स अँड इक्विपमेंट्स प्रा. लि.चे संस्थापक विनायक लोकूर यांचेही आभार मानले आहेत.

ज्येष्ठ धावपटू एस. एल. देवरमणी अलीकडच्या काळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेऊन देशाचा नावलौकिक सातत्याने वाढवत आहेत. स्पर्धेच्या निमित्ताने त्यांनी नेपाळ श्रीलंका, स्वीडन, दुबई, मलेशिया आणि सिंगापूर या देशांना भेटी दिल्या आहेत. आता उपरोक्त स्पर्धेतील यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.